पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:45+5:302021-08-02T04:06:45+5:30
--------------------- पांढरी वस्ती शाळेत वृक्षारोपण नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरी वस्ती येथे "डोनेट ...
---------------------
पांढरी वस्ती शाळेत वृक्षारोपण
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरी वस्ती येथे "डोनेट अ डिव्हाइस" उपक्रमांतर्गत गरीब विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइलवाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण उपक्रमांतर्गत शाळेच्या आवारात झाडे लावण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद, पण शिक्षण चालू" या उपक्रमानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.
---------------------------
वाढत्या महागाईने नागरिक हैराण
नांदूरशिंगोटे : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल-डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी भाड्यामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने भाववाढ कमी करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
---------------------------
कांद्याला दोन हजार रुपये भाव
नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला दोन हजार रुपये भाव मिळाला. या लिलावासाठी एकूण ८१०६ गोण्या म्हणजे ४५४० क्विंटल आवक झाली होती. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कांद्याच्या भावात चढउतार दिसून येत आहे. सरासरी १७०० ते १८०० रुपये भाव मिळाला आहे.
---------------------------
कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सेवा संस्कार संस्थेच्या मालदाड (ता. संगमनेर) येथील कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाडचे विद्यार्थी कृषीदूत योगेश राजेंद्र बैरागी यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभवाच्या अभ्यासदौऱ्याचा आरंभ केला. कृषीदूत बैरागी यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीविषयी सुरक्षिततेचे उपाय, काळजी आणि कोविड लसीकरण जनजागृती केली.
----------------------------
दापूर परिसरात आंतरमशागत कामांना वेग
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिके चांगलीच बहरली आहे. त्यामुळे शेतकरी आंतरमशागतीच्या कामाला लागले आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतात खुरपणी, कोळपणी, पिकांना खते देणे, औषध फवारणी ही कामे केली जात आहे. पिके वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करून प्रयत्न केले जात आहे.