शौनक अभिषेकी यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:33 AM2018-06-18T00:33:33+5:302018-06-18T00:33:33+5:30
श्यामरंग संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी हनुमंत फडतरे आणि सुरेश फडतरे यांच्या संवादिनीच्या साथीने रंगलेल्या तबला वादनाच्या जुगलबंदीने नाशिककरांची मने जिंकली. तर उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांच्या ख्याल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
नाशिक : श्यामरंग संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी हनुमंत फडतरे आणि सुरेश फडतरे यांच्या संवादिनीच्या साथीने रंगलेल्या तबला वादनाच्या जुगलबंदीने नाशिककरांची मने जिंकली. तर उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांच्या ख्याल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.तरंगिणी प्रतिष्ठान, कुसुमाग्रज प्र्रतिष्ठान आणि संवादी यांच्यातर्फे संयुक्तरीत्या आयोजित दोनदिवसीय श्यामरंग संगीत सोहळ्याचा रविवारी (दि.१७) पंडित शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय गायनाने समारोप झाला. प्रारंभी राग पुरीया कल्याण रुपक तालात आणि नंतर पहाडी धून सादर करताना हनुमंत फडतरे व सुरेश फडतरे यांची जुगलबंदी रंगली. संवादिनीवरील विविध स्वरांच्या रचनाकृती आणि त्याला तबल्याने दिलेल्या साथसंगतीने जुगलबंदीत रंगत वाढली. तर उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांनी राग सरस्वती सादर करताना रुपक तालात ‘रैन की बात’ व द्रुत त्रितालातील ‘सजन बिन कैसे’ बंदिशींच्या ख्याल गायनाने रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर ठुमरी आणि हिंदी भजनांचेही शौनक अभिषेकी यांनी सादरीकरण केले. त्यांना संवादिनीवर सुभाष दसककर, तबल्यावर नितीन वारे आणि तानपुºयावर सत्यजित बेडेकर व स्नेहा देशपांडे यांनी साथसंगत केली.