निफाड तालुक्यात तीव्र आंदोलन

By admin | Published: June 2, 2017 12:31 AM2017-06-02T00:31:17+5:302017-06-02T00:31:58+5:30

निफाड : शेतकरी संपाच्या आंदोलनास पहिल्या दिवशी निफाड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

Fast movement in Niphad taluka | निफाड तालुक्यात तीव्र आंदोलन

निफाड तालुक्यात तीव्र आंदोलन

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : शेतकरी संपाच्या आंदोलनास पहिल्या दिवशी निफाड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या तालुक्यात टेम्पो, ट्रकमधील शेतमाल रस्त्यावर फेकणे, रास्ता रोको, दूध, भाजीपाला विक्री बंद आदी मार्गाने हे आंदोलन यशस्वी झाले. या तालुक्यातील लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले होते, तर या तालुक्यात दूध संकलन केंद्र बंद असल्याने या तालुक्यातून इतर शहरात दूध जाऊ शकले नाही.
नैताळे येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नैताळे, रामपूर, गाजरवाडी, सोनेवाडी, श्रीरामनगर येथील असंख्य शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता शेतमालाची वाहतूक करणारे ट्रक अडवून त्यामध्ये असलेला डाळिंब, कांदा, आंबे, बटाटे हा शेतमाल रस्त्यावर ओतून सरकार विरोधातील आपला संताप व्यक्त केला. आंबे वाहतूक करणारी एक पिकअप जीप आंदोलकांनी उलटी करून आपला निषेध नोंदवला.
यानंतर तातडीने निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व पोलीस पथक आंदोलनस्थळी हजर झाले. मात्र जमाव नियंत्रणाबाहेर असल्याने राज्य राखीव दलास पाचारण करण्यात आले. या जवानांनी आंदोलनस्थळी येताच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनीही पोलिसांवर तुफान दगडफेक केली.
पोलिसांनी निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, सदाशिव कोटकर, रतन बोरगुडे, विनोद घायाळ, बाळासाहेब जाधव यांना अटक केली. पाच शेतकऱ्यांना अटक झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरयांनी दुपारी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
निफाडचे तहसीलदार विनोद भामरे, निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अटक केलेल्या पाच शेतकऱ्यांना सोडण्यात आले व रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल कुंदे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी नैताळे येथे भेट दिली व शांततेच्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी आवाहन केले. दुपारी पुनश्च अतिरिक्त राज्य राखीव दलाच्या तुकडीस पाचारण करण्यात आले होते.

Web Title: Fast movement in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.