भोजापूर धरणात उपोषण
By admin | Published: June 23, 2014 11:23 PM2014-06-23T23:23:36+5:302014-06-24T00:37:00+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील पाणी वाचविण्यासाठी सोनेवाडी ग्रामस्थांनी सोमवारपासून (दि.२३) भोजापूर धरणातील देवांशीबाबा मंदिराजवळ उपोषणास प्रारंभ केला आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील पाणी वाचविण्यासाठी सोनेवाडी ग्रामस्थांनी सोमवारपासून (दि.२३) भोजापूर धरणातील देवांशीबाबा मंदिराजवळ उपोषणास प्रारंभ केला आहे. परिसरातील नांदूरशिंगोटे, दोडी, कणकोरी, मानोरी आदि गावांतील ग्रामस्थांनी या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकाळपासून शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.
सोमवारी सोनेवाडी गावातून फेरी काढून धरणातील मोकळ्या जागेवर उपोषणास बसले. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. भोजापूर धरणातील बेकायदेशीर खोदलेल्या विहिरी त्वरित बुजविण्यात याव्यात, बेकायदेशीर वीजजोडणी तत्काळ खंडित करण्यात यावी, धरणातून अवैध जलवाहिनीद्वारे पाणीचोरी करणाऱ्यांवर तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी सकाळी ११ वाजता उपोषणास प्रारंभ झाला. या प्रसंगी सरपंच प्रमिला सहाणे यांनी सोनेवाडी येथील ३६५ हेक्टर जमीन भोजापूर धरणासाठी संपादित करण्यात आली आहे. परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना या धरणाचा काहीही उपयोग झाला नाही. गेल्या तीन ते चार वर्षात धरणाच्या क्षेत्रात गुंठाभर जमीन घेऊन तेथे विहीर खोदून त्यातील पाणी सुमारे १५ किलोमीटरपर्यंत नेण्यात आले आहे. काही लोकांनी खासगी कंपन्यांना पाणी दिले आहे. पाणीप्रश्नासंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासमवेत ग्रामस्थांच्या दोन वेळेस बैठका घेतल्या. त्यावेळी पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीला आदेश देऊनही त्यांच्याकडून काहीही कार्यवाही झाली नाही. याबाबत आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बैठक होऊनही यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभाग, महसूल व वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषण सुरू केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी आनंदराव शेळके, संजय शेळके, सरपंच एकनाथ आव्हाड, गणपत केदार यांची भाषणे झाली. या उपोषणास त्र्यंबक गोसावी, लहानू सहाणे, गजानन रावले, विक्रम देशमुख, कैलास रावले, सचिन सहाणे, सौैरभ देशमुख, सुभाष सहाणे, शरद देशमुख, भागवत सहाणे, बाळू पवार, प्रमोद रावले, अशोक सहाणे, योगेश परदेशी, रामनाथ मेंगाळ, विनोद देशमुख, संतोष आदमे, अहमद शेख, विशाल जगताप आदिंसह शेकडो ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.
वावी पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. रसेडे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)