वीज कंपनी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:51 AM2017-07-22T00:51:41+5:302017-07-22T00:51:55+5:30
येवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले. मात्र गेल्या दोन महिन्यात हे खांब पुन्हा उभे न केल्याने संबंधित खांबावर विहिरीची जोडणी असलेल्या अनिल कदम या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह विद्युत कंपनीच्या येवला कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील नेऊरगावचे शेतकरी अनिल निवृत्ती कदम यांच्या विहिरीवर असलेल्या वीज जोडणीपर्यंत येणारे दोन खांब दि. ११ मे रोजी वादळात पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. वेळोवेळी मागणी करूनही विद्युत कंपनी खांब उभारणीसाठी काहीही प्रयत्न करीत नसल्याने कदम यांना मका, डाळींब या पिकांना पाणी देण्यास बाधा निर्माण झाली आहे.
वीज वितरण कंपनीकडे हे खांब उभारणीसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अनिल कदम यांनी निवृत्ती कदम, द्रौपदाबाई कदम, दिलीप कदम, हिराबाई कदम, अर्चना कदम, तेजस कदम, अक्षय कदम, कल्याणी कदम आदिंनी उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.