क्रांतिवीर सेनेचे आयुक्तालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:25 AM2018-10-30T01:25:14+5:302018-10-30T01:25:58+5:30
अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
नाशिक : अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी अवैध वाळूसाठा करू दिला, शासनाचा महसूल बुडवून स्वत:च्या फायद्याकरिता शासनाचे आदेश धाब्यावर बसवून अनागोंदी कारभार चालविल्याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यां-मार्फत सदर प्रकरणी शहनिशा करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून अहमदनगरचे जिल्हाधिकारी द्विवेदी हे तहसीलदार कदम यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्षम अधिकाºयाची नियुक्ती करून न्यायपूर्ण चौकशी करण्यात यावी, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यावर कारवाई करण्याबरोबर तहसीलदार कदम यांना बडतर्फ करावे अशी मागणी निवेदनात केली आहे. उपोषणकर्ते वाघ यांची गणेश कदम, करण गायकर, किरण डोखे, मीराताई दुसाने, किरण बोरसे, राजाराम शिंदे, मयुरी पिंगळे, संजय हजार आदींनी भेट घेऊन माहिती घेतली.