बंधाऱ्यातील गळाभर पाण्यात उपसले उपोषणास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:36 AM2021-02-05T05:36:25+5:302021-02-05T05:36:25+5:30
सिन्नर : वारंवार मागणी करून व अनेकदा निवेदने देऊनही समृध्दी महामार्गाच्या कामामुळे तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष ...
सिन्नर : वारंवार मागणी करून व अनेकदा निवेदने देऊनही समृध्दी महामार्गाच्या कामामुळे तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याच्या निषेधार्थ सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी बंधाऱ्यातील पाण्यात पोहत जाऊन गळ्यापर्यंतच्या पाण्यात चार तास उभे राहत अनोखे उपोषण करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
समृध्दी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला गुंगारा देत शिंदे यांनी बंधाऱ्यात पोहत जाऊन नागेश्वर मंदिराच्या ओट्यावर गळ्यापर्यंतच्या पाण्यात सुमारे चार तास ठिय्या मांडून अनोखे उपोषण केल्याची घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली. सिन्नर तालुक्यातील २६ गावांमधून सुमारे ६१ किलोमीटर अंतर समृध्दी महामार्ग जातो. महामार्गाच्या कामामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांद्वारे वाळू, खडी, मुरुम वाहतूक सुरू आहे. या अवजड वाहतुकीमुळे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक रस्त्यांचे डांबर जाऊन त्यावर केवळ खड्डे आणि मुरुम शिल्लक आहे.
या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. सुरुवातीला तोंडी मागणी नंतर लेखी निवेदन आणि त्यानंतर आंदोलनाचा इशारा देऊनही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने शिंदे यांनी अनोखा उपोषणाचा मार्ग निवडला. त्यानुसार शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावानजीक असलेल्या नागेश्वर मंदिराच्या चोहोबाजूने असलेल्या व तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यात उपोषण करण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी उपोषण करू नये यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवले जात होते. मात्र, शिंदे यांनी प्रशासनाला गुंगारा देत गळाभर पाण्यात केवळ चेहरा दिसेल इतक्या पाण्यात उभे राहून उपोषण सुरू केले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता बोरसे यांना घटना समजल्यानंतर ते त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बंधाऱ्यावर पोहोचले व शिंदे यांना पाण्यातून बाहेर बोलविण्यात आले. बोरसे यांनी खराब झालेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून टप्प्याटप्प्याने रस्त्यांची दुरुस्ती सुरु करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिंदे यांनी उपोषण मागे घेतले.
चौकट-
पोलीस अनभिज्ञ
शिंदे यांनी नागेश्वर बंधाऱ्यात पोहत जाऊन उपोषण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र, शिंदे यांच्या या पाण्यातील उपोषणाची माहिती न मिळाल्याने पोलीस घटनास्थळी नव्हते. पोलीस या आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
चौकट-
यापूर्वीही केले होते आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी २००७ साली वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागेश्वर बंधाऱ्यातील याच मंदिराच्या कळसावर बसून आंदोलन केले होते. त्यावेळी शिंदे यांनी पोहत जाऊन कळस गाठला होता. अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाण्यात बोलावले जात होते. यावेळच्या आंदोलनाने २००७ च्या आठवणींना उजाळा मिळाला.
फोटो - २८ शिंदे उपोषण-३
नागेश्वर बंधाऱ्यात पाण्यात पोहत जाऊन उपोषण करतांना सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे.
फोटो - २८ शिंदे उपोषण- १
शिंदे यांच्या उपोषणाची पाणी देऊन सांगता करतांना रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी बोरसे.
===Photopath===
280121\28nsk_38_28012021_13.jpg~280121\28nsk_39_28012021_13.jpg
===Caption===
फोटो - २८ शिंदे उपोषण-३नागेश्वर बंधाऱ्यात पाण्यात पोहत जाऊन उपोषण करतांना सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे.~फोटो - २८ शिंदे उपोषण- १ शिंदे यांच्या उपोषणाची पाणी देऊन सांगता करतांना रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी बोरसे.