सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस व ट्रकची धडक; दहा जणांचा मृत्यू तर ३४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 08:45 AM2023-01-13T08:45:07+5:302023-01-13T08:46:10+5:30
उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. प्रवासी यादीनुसार बसमध्ये नव्हते काही प्रवासी बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते.
- शैलेश कर्पे
सिन्नर (जि नाशिक) : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. त्यानंतर खासगी बस रस्त्यावर उलटली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश असून दोन पुरुष व दोन लहान मुले आहेत. वावी पाथरे दरम्यान पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर भीषण अपघात झाला. दहा जणांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या आणण्यात आले आहेत. या अपघातात ३४ जण जखमी असून त्यांना सिन्नरच्या विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला. अंबरनाथ, उल्हासनगर भागातून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खासगी आराम बस (क्र. एम एच ०४ एफ के २७५१) सुमारे ५० प्रवाशांना घेऊन शिर्डी कडे निघाली होती. शिर्डी महामार्गावर वावी गावानंतर आराम बस व ट्रक(क्र. एम एच ४८ यांची समोरासमोर धडकली. त्यानंतर खासगी बस उलटली.
या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर जण जखमी झाले. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ७ ते ८ रुग्णवाहिका रुग्णांना रुग्णाला देण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिसांचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.
अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे येथून सुमारे १५ खासगी बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या अशी माहिती मिळते. अपघातग्रस्त बस पाच नंबर ची असल्याचे समजते. प्रवासी यादीनुसार बसमध्ये नव्हते काही प्रवासी बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते. जखमींना विविध ठिकाणी नेल्याने मृतांची व जखमींची नावे कळण्यास उशीर होईल. अपघातात बस एक बाजू पूर्णपणे कापली गेली.जखमींमध्ये महिला व बालकांचा समावेश आहे. मृतांमध्ये सहा महिला दोन पुरुष व दोन लहान बालकांचा समावेश आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता व काचेचा खच साचला होता.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे
१) प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-४५,
२) वैशाली नरेश उबाळे, वय ३२,
३) श्रावणी सुहास बारस्कर,वय ३०,
४) श्रद्धा सुहास बारस्कर, वय-४
५) नरेश मनोहर उबाळे,वय-३८ या सर्व रा.अंबरनाथ
६) बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५(ड्रायव्हर)
७) दिक्षा संतोष गोंधळी, वय-१८ रा.कल्याण