नाशिक-वणी रस्त्याचे भाग्य उजळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:47 AM2021-02-05T05:47:42+5:302021-02-05T05:47:42+5:30
दिंडोरी : हायब्रीड एन्यूटी कार्यक्रमाअंतर्गत नाशिक- कळवण रस्त्याचे भाग्य उजळेल ही आशा दोन वर्ष उलटले तरी अद्याप पूर्ण झाली ...
दिंडोरी : हायब्रीड एन्यूटी कार्यक्रमाअंतर्गत नाशिक- कळवण रस्त्याचे भाग्य उजळेल ही आशा दोन वर्ष उलटले तरी अद्याप पूर्ण झाली नसून सदर रस्त्याचे नूतनीकरणाचे काम रखडलेले आहे. दिंडोरी शहरातील रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेला असून त्याला वारंवार ठिगळे लावत मुलामा दिला जात आहेत.
ठेकेदाराच्या अक्षम्य दिरंगाईने अनेक अपघात झाले आहेत. वाहनधारकांचे नुकसान व नागरिकांची गैरसोय होत असताना लोकप्रतिनिधी गप्प असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अक्राळे फाटा ते वणी रस्त्याचे नूतनीकरण हायब्रीड एन्यूटी कार्यक्रमांतर्गत भाजप शासन काळात मंजूर होत एक खासगी बांधकाम कंपनीने काम घेतले, मात्र तिसरे वर्ष सुरू झाले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नसून झालेल्या रस्त्यालाही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याचे काम संथ गतीने होत असल्याने अनेक अपघात झाले आहेत. दिंडोरी शहरात दुतर्फा भुयारी गटार पदपथ व रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण होणार होते. मात्र अद्याप त्यास मुहूर्त मिळाला नसून शहरात रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडत आहेत. कधी मुरुमाने तर कधी डांबराने थातूरमातूर खड्डे बुजवले जात आहेत. पहिले खड्डे बुजवत होत नाही तर पुन्हा खड्डे पडत आहेत. सदर रस्त्याबाबत संबंधित विभागाचे अधिकारीही संबंधित ठेकेदारांपुढे हतबल झाल्याचे चित्र असून सदर कामाची चौकशी होऊन सदर काम हायब्रीड एन्यूटी कार्यक्रमातून काढून घेत सदर काम बांधकाम विभागामार्फत त्वरित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
इन्फो
नुसता आश्वासनांचा बोलबाला
तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी वर्षात चांगल्या दर्जाच्या कामाचे आश्वासन दिले गेले मात्र काम अद्याप पूर्ण झाले नाही. दीड वर्षांपूर्वी भारती पवार यांनी खासदार होताच सदर रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी दिंडोरीत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी सात दिवसात काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले मात्र दीड वर्ष उलटले तरी अद्याप काम सुरू झाले नाही. आमदार नरहरी झिरवाळ यांनाही काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले, मात्र कामात कोणतीच प्रगती नसल्याने संबधित यंत्रणा लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचे चित्र आहे.