दापूरला शेततळ्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:59 AM2019-12-13T01:59:59+5:302019-12-13T02:00:39+5:30
सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विष्णू एकनाथ पवार (४०) व मुलगा प्रतीक विष्णू पवार (६) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील मूळचे रहिवासी असलेले विष्णू पवार हे गेल्या काही वर्षांपासून सासूरवाडी असलेल्या दापूर येथे वास्तव्यास होते. गुरुवारी दुपारी विष्णू पवार हे दोन्ही मुलांसह शेळ्या चारण्यासाठी दापूरच्या उत्तरेला असलेला दरा शिवारात गेले होते. या भागात संभाजी शिवाजी आव्हाड यांचे शेततळे आहे. प्रतीक हा शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी डोकावला असता, त्याचा पाय घसरून तो तळ्यात पडला. सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार प्रवीण अढांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुलाला वाचविण्यासाठी विष्णू यांनी पाण्यात उडी घेतली. ही घटना घडत असताना दुसरा आठ वर्षांचा मुलगा काठावर होता. त्याने तातडीने घरी येऊन याबाबतची माहिती दिली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी हलविले; मात्र तत्पूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.