लोकप्रतिनिधीच्या वडिलांनी नांगरला वहिवाट रस्ता
By admin | Published: August 5, 2016 11:56 PM2016-08-05T23:56:13+5:302016-08-05T23:56:23+5:30
शेतकऱ्यांची गैरसोय : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याचा वचपा काढला
पाटोदा : ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मतदान न केल्याने पराभव झाल्याचे शल्य मनात ठेवून पाटोदा गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सोनाली पवार यांच्या वडिलांनी खडीकरण झालेला दहेगाव - पाटोदा शिवारातील जाधव वस्ती ते धनवटे वस्तीदरम्यानचा रस्ताच नांगरून टाकल्याने परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. या वहिवाट रस्त्याने शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांची रस्त्याअभावी शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
याबाबत दहेगाव येथील ग्रामस्थांनी पाटोदा शिवारातील जाधव वस्ती ते धनवटे वस्तीचा रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती तालुक्याच्या अधिकारीवर्गाला निवेदन देऊन केली आहे; मात्र संबंधित अधिकारी पवार यांच्या राजकीय दबावापोटी लक्ष देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
सदर तीन किलोमीटर रस्त्याचे खडीकरणाचे काम माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर यांनी २००८ साली जिल्हा परिषदेच्या विशेष दुरु स्ती योजनेतून केले. मात्र आपल्या राजकीय वर्चस्वाचा वापर करून मुलगी जि.प. सदस्य असल्यामुळे पदाचा गैरफायदा घेऊन अशोक वामन पवार यांनी त्यांच्या मालकीचा गट नंबर ४५ जवळील वहिवाट रस्ता नांगरून नष्ट करून टाकला आहे व गट नंबर ४५ मध्ये रस्त्याचे क्षेत्र अतिक्रमण करून समाविष्ट केले आहे.
गट नंबर ४५ च्या मागे पुढे सदरचा रस्ता कायम असून, पवार यांनी शेजारील रस्ता शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी नष्ट केला असल्याची तक्रार निवेदनात केली आहे.
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, पेरणी करणे, पिकांची कोळपणी करणे, निंदणी करणे, पिकांना खते टाकणे गरजेचे आहे, मात्र रस्ता नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतात ये- जा करता येत नसल्याने शेती पडीत ठेवण्याची वेळ आली आहे. तसेच मुलांना शाळेत जाण्यासाठी हाच रस्ता होता मात्र तो नांगरल्याने मुलांना शाळेत जाता येत नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गट नंबर ४५ च्या समोरील नष्ट झालेला रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, मंडळ अधिकारी आर के खैरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन, बांधकाम विभाग पंचायत समिती येवला यांना निवेदने दिली आहेत. निवेदनावर रामचंद्र घोरपडे, भागवत बोराडे, प्रकाश पगार, सखाराम गुंडगळ , मधुकर गाजरे, चांगदेव दौंडे, गणेश दौंडे, विठ्ठल दौंडे, बबन माणिक जाधव, अर्जुन जाधव, माधव राजगुरू, बाबूराव काळे, रामदास जाधव, शिवाजी बटवल, बबन ओंकार बटवल, अमिन शेख, साहेबराव पवार, अशोक घोरपडे, समाधान पवार, ज्ञानेश्वर पगार आदिंच्या सह्या आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांनी मे महिन्यात प्रांताना तर जुलै महिन्यात पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.(वार्ताहर)