धान्य दानाने फेडले पितरांचे ऋण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:16 AM2019-09-29T00:16:09+5:302019-09-29T00:16:27+5:30
नसती उठाठेव मित्रपरिवरातर्फे गेल्या ११ वर्षांपासून पितृपक्षात पितरांच्या स्मरणार्थ ‘धान्य दान’ हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी दान केलेले धान्य वृद्धाश्रम व अनाथाश्रमला दिले जाते. यावर्षी सुमारे ५० क्विंटल धान्य व रोकड जमा करत या परिवाराने नागरिकांच्या पितरांचे ऋण फेडण्याचे काम केले आहे.
नाशिक : नसती उठाठेव मित्रपरिवरातर्फे गेल्या ११ वर्षांपासून पितृपक्षात पितरांच्या स्मरणार्थ ‘धान्य दान’ हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी दान केलेले धान्य वृद्धाश्रम व अनाथाश्रमला दिले जाते. यावर्षी सुमारे ५० क्विंटल धान्य व रोकड जमा करत या परिवाराने नागरिकांच्या पितरांचे ऋण फेडण्याचे काम केले आहे. पितरांना आपण घरात जेऊ घालतो.
मात्र समाजात उपाशी व गरजू अशा गरिबांसाठी मंडळातर्फे दरवर्षी ‘पितरांचा महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही गंगापूररोडवरील नृसिंहनगर येथे सकाळपासूनच नागरिकांनी याठिकाणी त्यांच्या पितरांच्या स्मरणार्थ विविध धान्य दान केले. या दानात गहू, तांदूळ, सर्व प्रकारच्या दाळी, गूळ, तूप, तेल तसेच पैशांच्या स्वरूपात दान आले आहे. यावेळी सुमारे ५० क्विंटल धान्य जमा झाले असून, हे धान्य शहरातील ‘दिलासा’ वृद्धाश्रम, ‘पडसाद’ कर्णबधिर मुलांची शाळा, ‘प्रबोधिनी ट्रस्ट’ मानसिक अपंग मुलांची शाळा, ‘वात्सल्य’ वृद्धाश्रम, ‘वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय’, ‘गाडगे महाराज आश्रम शाळा’, ‘अंधशाळा प्रशिक्षक संस्था’, विवेकानंद प्रशिक्षण व सेवा कें द्र, पिंपळद या संस्थांना दान आलेले धान्य देण्यात येणार आहे. यावर्षी सुमारे १५० जणांनी मंडळाकडे धान्य दान क रत आपल्या पितरांचे ऋण फेडले. कार्यक्रमप्रसंगी मंडळाचे बापू कोतवाल, दिलीप कुलकर्णी, मंदार वडगाव, विजय बच्छाव, सुनील आहिरे, सुनील नाखरे आदी उपस्थित होते.
आई-वडील व सासू-सासरांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही मंडळाला धान्य दान करत असतो. जमा झालेले धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम मंडळाकडून करण्यात येते त्यामुळे हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. आपले जे पूर्वज आहे त्यांना या उपक्रमातून स्मरण केले जाते. त्यामुळे धान्य दान केल्याचे समाधान वाटत आहे.
- सुखदा दापोरकर, स्थानिक
श्रद्धेसाठी दरवर्षी आम्ही मंडळाकडे धान्य दान करत आहोत. समाजाप्रती एक सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळाचे हे कार्य प्रशंसनीय आहे. घरातील पितरांचे कर्म करताना मंडळाकडे वंचित घटकांसाठी धान्याच्या स्वरूपात दान केल्याचे समाधान वाटत आहे.
- पराग जवेरी, स्थानिक