चार माजी आमदारपुत्रांनी राखला वडिलांचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:11 AM2019-10-27T01:11:23+5:302019-10-27T01:11:57+5:30

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये यंदा आजी-माजी आमदारांचे पुत्रही नशीब आजमावत होते. त्यात दहा आमदारपुत्रांचा समावेश होता. वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालविताना या निवडणुकीत दहापैकी चार आमदारपुत्रांना यश आले; मात्र सहा आमदारपुत्रांना पराभवाचा धक्का बसला.

 Father's legacy retained by four former MLAs | चार माजी आमदारपुत्रांनी राखला वडिलांचा वारसा

चार माजी आमदारपुत्रांनी राखला वडिलांचा वारसा

Next

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये यंदा आजी-माजी आमदारांचे पुत्रही नशीब आजमावत होते. त्यात दहा आमदारपुत्रांचा समावेश होता. वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालविताना या निवडणुकीत दहापैकी चार आमदारपुत्रांना यश आले; मात्र सहा आमदारपुत्रांना पराभवाचा धक्का बसला. त्यात डॉ. अपूर्व हिरे, योगेश घोलप, निर्मला गावित, पंकज भुजबळ, आसिफ शेख व यतिन कदम यांचा समावेश आहे. यामधील यतिन कदम वगळता अन्य पाचही उमेदवारांनी यापूर्वी विधानसभा अथवा विधान परिषदेत पाऊल ठेवलेले आहे.
डॉ. राहुल आहेर
चांदवड-देवळा मतदारसंघातून भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री मिळविली आहे. राहुल आहेर हे माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे पुत्र आहेत. स्व. दौलतराव आहेर यांनी १९८५ मध्ये पहिल्यांदा नाशिक मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी करून विजय संपादन केला होता. युती सरकारमध्ये त्यांनी आरोग्य मंत्रिपद भूषविले होते. डॉ. दौलतराव आहेर यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा राहुल यांनी पुढे नेला. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी सर्वप्रथम नाशिक पश्चिममधून उमेदवारी केली; परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर राहुल आहेर यांनी २०१४ च्या निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघाला पसंती दिली आणि सलग दुसरा विजय मिळविला.
अ‍ॅड. राहुल ढिकले
नाशिक पश्चिम मतदारसंघातून अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजय संपादन केला. राहुल हे दिवंगत आमदार व खासदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आहेत. उत्तमराव ढिकले हे एक कुशल राजकारणी म्हणून जिल्ह्यात परिचित होते. नगरसेवकापासून ते महापौर, आमदार-खासदारपर्यंतचा त्यांनी राजकीय प्रवास अनुभवला. उत्तमराव ढिकले शिवसेनेचे खासदार होते, तर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी नाशिक पूर्वमध्ये मनसेकडून उमेदवारी करून विजय संपादन केला होता. त्यांचा राजकीय वारसा पुढे चालविणाºया राहुल ढिकले यांचा मनसे ते भाजप असा प्रवास राहिला आहे. आता त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवून विधानसभा गाठली.
नितीन पवार
कळवण-सुरगाणा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार राष्टÑवादीकडून उमेदवारी करून विधानसभेवर निवडून आले आहेत. स्व. ए. टी. पवार यांचे ते पुत्र आहेत. आदिवासीबहुल भाग असलेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात ए. टी. पवार यांचा गेली पाच दशके प्रभाव होता. कळवण विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा निवडून गेलेले ए. टी. पवार यांनी मंत्रिपदही भूषविले होते. वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवून नितीन पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपला मतदारसंघ बांधला. त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांनीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. ए. टी. पवार यांच्या पश्चात त्यांनी आता विधानसभेत पाऊल ठेवले आहे.
सरोज अहिरे
देवळाली मतदारसंघातून राष्टÑवादीकडून उमेदवारी करून सरोज अहिरे यांनी माजी मंत्री बबन घोलप यांचे गेल्या तीन दशकांपासून असलेले संस्थान खालसा केले आहे. घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांचा पराभव करून त्यांनी मतदारसंघात इतिहास घडविला. सरोज अहिरे या माजी आमदार बाबुलाल सोमा अहिरे यांच्या कन्या आहेत. देवळाली मतदारसंघातून बाबुलाल अहिरे यांनी १९७८ आणि १९८० या दोन निवडणुकांमध्ये विजय संपादन करून विधानसभेवर प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा राजकीय वारसा सरोज या पुढे नेत आहेत. सरोज अहिरे यांनी महापालिका निवडणुकीत महापौर नयना घोलप यांचा पराभव केला होता, तर आता घोलप पुत्राचा पराभव करून विधानसभा गाठली आहे.

Web Title:  Father's legacy retained by four former MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.