वडिलांचा दुचाकीवरील ताबा सूटल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:36 PM2019-01-24T18:36:16+5:302019-01-24T18:36:28+5:30
दुचाकी रस्त्यावरुन पुढे जात असलेल्या घंटागाडीला जाऊन शनिवारी (दि.१९) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास धडकली.
नाशिक : आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला दुचाकीवरुन घेऊन जात असताना अचानकपणे दुचाकीचालक सुनील देविदास मराठे (रा.सातपूर) यांचा दुचाकीवरील (एम.एच.३९ के ५२२५) ताबा सुटला. त्यामुळे समोरील घंटागाडीवर दुचाकी जाऊन आदळली. या धडकेत छातीस जबर मार लागल्याने रुद्रांश सुनील मराठे या मुलाचामृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड लिंकरोडवरून सातपूरकडे जात असताना दत्त मंदिर चौफूलीवर मराठे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. यावेळी दुचाकी रस्त्यावरुन पुढे जात असलेल्या घंटागाडीला जाऊन शनिवारी (दि.१९) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास धडकली. या धडकेत दुचाकीवर वडीलांसोबत जात असलेल्या रुद्रांशचा मृत्यू झाला. तर सुनील यांनाही मार लागला. रुद्रांशच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दुचाकीचालक मराठे यांनी यावेळी हेल्मेट परिधान केलेले नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. याप्रकरणी सुनील भालेराव (२७, रा.प्रबुध्दनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.