लेकीच्या विवाहानंतर पित्याची आत्महत्या
By admin | Published: May 19, 2017 12:26 AM2017-05-19T00:26:56+5:302017-05-19T00:27:42+5:30
नांदगाव : लग्नातील फेट्याने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : आदल्या दिवशी मुलीच्या लग्नात मिळालेला मानाचा फेटाच मानेला गुंडाळून आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव परिसरात घडली. राजेंद्र बाबूराव खेडकर (५०) घाटशीळ, ता. पारेगाव, जि. बीड हे मयत इसमाचे नाव असून, त्यांच्यावर नाशिक येथील मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते.
अंगावरची हळद उतरण्याआधी नियतीने घाला घातला. अघटित घडले. नवरी काशीबाईवर विवाहाच्या आनंदावर पहिल्याच दिवशी पित्याच्या मृत्यूची कुऱ्हाड कोसळली. तिचे वडील मयत राजेंद्र खेडकर यांची सासुरवाडी वेहेळगावची असून, मुलगी काशीबाई हिलासुद्धा तिथेच भाबड परिवारात देण्यात आले आहे. त्यानिमित्ताने खेडेकर व आप्तेष्ट एकत्र आलेले होते. काशीबाईचे लग्न मामाच्या गावी वेहेळगावी बुधवारी दुपारी १ वाजता झाले. रात्री सर्व पै पाहुणे गाढ झोपेत असताना पहाटे (गुरु वार) उठून खेडकर घराबाहेर गेले. ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. सकाळी ते घरात नाही हे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू झाली.
दरम्यान, सकाळी संतोष गिते यांना मोबाइल आला. त्यावरून एका झाडाला कोणीतरी गळफास घेऊन लटकलेले आहे असे कळाले. त्यांनी लगेच पोलीस हवालदार चौधरी यांना ही खबर दिली. ते ठिकाण शेरेकर यांच्या घरापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर असून, बाळू विठ्ठल यांच्या शेतातील ते झाड आहे.
चौकशीसाठी गिते यांच्यासह काहीजण तिकडे गेले असता त्यांच्यातील सर्जेराव भाबड यांनी झाडावर लटकलेली व्यक्ती कालच्या लग्नातला पाहुणा आहे, अशी माहिती दिली.
अधिक माहितीसाठी नवरी काशीबाई हिच्या मामींना (रत्ना काळू शेरेकर) घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी लटकलेली
व्यक्ती दुसरी कोणी नसून राजेंद्र खेडकर हेच असल्याचा खुलासा केला.