संरक्षण खात्याच्या फतव्याचा हजारोंना फटका
By admin | Published: March 19, 2017 11:57 PM2017-03-19T23:57:11+5:302017-03-19T23:57:50+5:30
नवा आदेश : शंभर मीटर परिघात बांधकामांना मनाई
नाशिक : शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा समस्त शहरवासीयांना वेगवेगळ्या कारणांनी त्रास होत असतानाच शहरात लष्करी हद्दीच्या परिसरातील बांधकामांना आता मनाई करण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील हजारो कुटुंबीयांना त्याचा फटका बसणार आहे. त्याच्या विरोधात आता नागरिक संघटित होत असून, येत्या शनिवारी (दि.२५) नाशिकरोड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक महापालिकेच्या नव्याने मंजूर बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत लष्करी हद्दीपासूनच्या एअर फनेलचा पुरेसा उल्लेख नाही. त्यातच आता संरक्षण खात्याने बांधकाम निर्बंधांबाबत नवा आदेश काढला आहे. त्यानुसार शहरातील लष्करी हद्दीपासूनच्या शंभर मीटर परिघात कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी असणार नाही. तसेच शंभर मीटरपासून ते पाचशे मीटर क्षेत्रापर्यंत केवळ पंधरा मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी असणार आहे. म्हणजेच केवळ तीनमजली इमारती बांधता येतील, त्यासाठीही लष्करी अधिकाऱ्यांचा ना हरकत दाखला लागणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील चाळीस हजार कुटुंबांचा प्रश्न निर्माण होणार आहे. एक कोटी चौरस मीटर क्षेत्रातील मिळकतींमुळे बांधकामे विस्थापित होणार आहेत. या गंभीर प्रकाराबद्दल नाशिकरोड परिसरातील नागरिक संघटित झाले असून, ३०० नागरिक यासंदर्भात कायदेशीर लढाईसाठी सज्ज झाले आहेत. माजी नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला असून, येत्या शनिवारी (दि.२५) सकाळी दहा वाजता उपनगर येथील इच्छामणी लॉन्सवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. या बैठकीस संबंधित बाधित नागरिकांनी सातबारा आणि भूमी अभिलेख यांच्याकडील उतारा समवेत घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. सहाणे यांनी केले आहे.संरक्षण खात्याच्या निर्णयाचा परिसरातील नागरिकांना फटका बसणार आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी परिसरातील तीनशे मिळकतधारकांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली असून, आणखी नागरिकांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.
- अॅड. शिवाजी सहाणे,
माजी नगरसेवक