परवानगीशिवाय फटाके विक्रीचे गाळे
By admin | Published: October 11, 2014 09:46 PM2014-10-11T21:46:05+5:302014-10-11T21:46:05+5:30
परवानगीशिवाय फटाके विक्रीचे गाळे
नाशिक : एरव्ही गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स उभारण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची प्रतीक्षा करणाऱ्या महापालिकेने फटाके विक्रीसाठी जागा निश्चित करताना मात्र पोलिसांना विचारणाच केलेली नाही. त्यामुळे जागा लिलाव केल्यानंतरही हे लिलाव रद्द केले जाऊ शकतात, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फटाके व्यावसायिक बुचकळ्यात पडले आहेत.
महापालिकेच्या वतीने रस्त्यावर गाळे उभारण्यासाठी परवानगी देताना पोलिसांकडून त्याची रूजवात केली जाते. वाहतुकीला अडथळे नसलेल्या ठिकाणीच अशा प्रकारे परवानगी दिली जाते. तसेच सुरक्षिततेबाबतही पोलीस यंत्रणा जागा तपासून निर्णय घेत असते. गोल्फ क्लब मैदानावर फटाके विक्रीचे गाळे लावताना ईद असल्यास पोलीस परवानगी नाकारतात. अशाच प्रकारे शासकीय रुग्णालयाच्या भिंतीलगत म्हणजेच शांतता क्षेत्रात गणेशमूर्तींचे गाळे उभारणीसाठी परवानगी देताना पोलिसांची परवानगी यासाठीच घेतली जाते. परंतु आता फटाके विक्रीच्या ३२ जागा निश्चित करताना महापालिकेने पोलिसांची परवानगीच घेतलेली नाही.
महापालिकेने येत्या १६ आणि १७ तारखेला गाळ्याचे लिलाव ठेवले आहेत. त्यासंदर्भात केलेल्या अटी-शर्तींमध्ये सदरचे लिलाव हे पोलिसांच्या ना हरकत दाखल्यांच्या अपेक्षेवर काढण्यात येत असून, ज्या गाळ्यांना पोलीस हरकत घेतील, त्या गाळ्यांचा लिलाव रद्द करण्यात येतील, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. त्यामुळे गाळ्यांसाठी परवानगीच घेतली नसेल, तर व्यावसायिकांना लिलावास भरीस पाडून नंतर पुन्हा जागेची शोधाशोध करण्यासाठी भ्रमंती करण्याची गरज काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)