फौजिया खान : सरकारची धोरणे अराजकता पोसणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 08:08 PM2018-08-08T20:08:20+5:302018-08-08T20:11:01+5:30
चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.
नाशिक : देशाचे सध्याचे सरकार व त्यांची धोरणे ही अराजकता पोसणारी आहेत. त्यामुळे लोकशाहीचा केवळ श्वास गुदमरतोय असे नाही तर ती मृतावस्थेत पोहचली आहे. सरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष फौजिया खान यांनी केली.
‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत उत्तर महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी भवन येथे बुधवारी (दि.८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार विजया चव्हाण, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, महिला आघाडीच्या प्रेरणा बलकवडे, समीना मेमन, सुषमा पगारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खान म्हणाल्या, माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती सुधारल्यानंतर संपुर्ण उत्तर महाराष्ट्रचे मिळून नाशिकमध्ये महिला आघाडीच्या वतीने ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत ‘इव्हीएम’ यंत्र व मनुस्मृतीची होळी करुन सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या सत्ताधारी भाजपा सरकारने लोकशाहीची हत्त्या केली असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष विरोधक म्हणून ही हत्त्या कदापी सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ असा आमचा नारा आहे. गुन्हे यापुर्वीदेखीलही घडत होते, मात्र सध्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या सरकारने लोकशाहीचे सर्व स्तंभ असुरक्षित केले आहे. चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.
निवडणुकांचे निकाल फिरतात कसे?
देशातील व राज्यामधील प्रत्येक समाज व बसचालक-वाहकांपासून शेतकºयांपर्यंत आणि शासकिय कर्मचाºयांपासून शिक्षकांपर्यंत सर्वच घटक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना हे सरकार निवडणुकांमध्ये कसे जींकून येते? निवडणुकांचे निकाल कसे फिरतात? लोकशाहीमध्ये असे कधीही घडत नाही, सरकार ईव्हीएम हॅकींगद्वारे हे घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप खान यांनी यावेळी केला.