चिमणराव, चेटकीण, टिपरे, चौकट राजा, हेरंबकर आणि गांधीजी या आवडत्या भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 02:50 AM2021-10-26T02:50:42+5:302021-10-26T02:51:08+5:30
माझ्या कारकिर्दीत मी एकासारखी दुसरी भूमिका कधीच केली नाही. त्यामुळे विविध प्रकारच्या भूमिका रंगविता आल्या. त्यातही मला घराघरांत पोहोचविणारा चिमणराव, मुलांपर्यंत पोहोचविणारी चेटकीण, माझेच लिखाण असलेले आबा टिपरे, ऐनवेळी साकारलेला चौकट राजातील नंदू, राष्ट्रीय पुरस्कार आणि मराठीच्या पल्याड घेऊन जाणारे गांधीजी आणि हसवाफसवीतील नव्वदीला पोहोचलेले रंगकर्मी कृष्णराव हेरंबकर यांच्या भूमिका माझ्या सर्वाधिक आवडत्या भूमिका असल्याचे प्रख्यात अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.
नाशिक : माझ्या कारकिर्दीत मी एकासारखी दुसरी भूमिका कधीच केली नाही. त्यामुळे विविध प्रकारच्या भूमिका रंगविता आल्या. त्यातही मला घराघरांत पोहोचविणारा चिमणराव, मुलांपर्यंत पोहोचविणारी चेटकीण, माझेच लिखाण असलेले आबा टिपरे, ऐनवेळी साकारलेला चौकट राजातील नंदू, राष्ट्रीय पुरस्कार आणि मराठीच्या पल्याड घेऊन जाणारे गांधीजी आणि हसवाफसवीतील नव्वदीला पोहोचलेले रंगकर्मी कृष्णराव हेरंबकर यांच्या भूमिका माझ्या सर्वाधिक आवडत्या भूमिका असल्याचे प्रख्यात अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.
कालिदासमधील पुरस्कार सोहळ्यानंतर रंगलेल्या मुलाखतीत प्रभावळकर बोलत होते. सर्व विषयांमध्ये रस असलेला एका मध्यमवर्गीय घरातील सर्वसाधारण मुलगा एम.एस्सी. केल्यावर संशोधन करू इच्छित होतो. मात्र, जीवनात घटना घडत गेल्या आणि मी रंगभूमीकडे वळल्याचे त्यांनी नमूद केले. पहिली भूमिका थेट रंगायतनमधील ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकात मिळाली. त्यानंतर काही काळाने चिमणराव आणि चेटकीणच्या भूमिकांनी मला प्रसिद्धी मिळवून दिली. मतकरी यांच्याकडे सहा नाटके आणि सहा बालनाट्य करताना मला खऱ्या अर्थाने माझ्यातील कलाकार गवसत गेल्याचेही प्रभावळकर यांनी नमूद केले. मी दिग्दर्शकाचा कलाकार आणि संपादकाचा लेखक होतो. माझ्या आयुष्यात अशी माणसे आली म्हणूनच मी अभिनय आणि लिखाणदेखील करू लागल्याचे प्रभावळकर यांनी नमूद केले. शिबानी जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
इन्फो
दोन अनपेक्षित भूमिका
चौकट राजातील नंदूची प्रमुख भूमिका परेश रावल, तर मी त्यातील दुसरी भूमिका करणार होतो. मात्र, काही कारणाने रावल यांनी भूमिका नाकारल्याने माझ्यावर नंदूची भूमिका करण्याची जबाबदारी दिग्दर्शक, निर्मात्यांनी टाकली अन् मी ती निभावली, तर मुन्नाभाईमध्ये मी त्यातील म्हाताऱ्या पेइंगगेस्टपैकी एका म्हाताऱ्याची भूमिका करणार होतो; पण ऐनवेळी दिग्दर्शक हिरानी यांनी मला गांधीचा गेटअप करून त्यांच्यासारखं काही करायला सांगितले. मी नाहीच म्हटलो. खरंतर घाबरलोही होतो. कारण मुन्नाभाई आणि गांधी असं काही लोकांना रुचेल का? आणि त्यातही राष्ट्रपित्याची भूमिका हास्यास्पद तर होणार नाही ना, अशी भीतीदेखील होती. मात्र, मी जे काही केलं ते हिरानी आणि चोप्रांना आणि प्रेक्षकांनादेखील भावल्याचे निश्चितच समाधान असल्याचे प्रभावळकर यांनी नमूद केले.