पालकांमध्ये संताप : नवीन इमारत बांधण्याच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष तोरणानगर शाळेला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:37 AM2018-01-07T00:37:08+5:302018-01-07T00:37:45+5:30
सिडको : येथील तोरणानगर भागातील महापालिकेच्या शाळेला घरघर लागलेली असून, सदर शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर शाळेला धोकादायक ठरविण्यात आले आहे.
सिडको : येथील तोरणानगर भागातील महापालिकेच्या शाळेला घरघर लागलेली असून, सदर शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर शाळेला धोकादायक ठरविण्यात आले आहे. यांनतर मनपा आयुक्तांनीही पाहणी केल्याने शाळेची दयनीय अवस्था पाहून त्यांनीही धोकादायक शाळेच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांंना आदेशित केले असले तरी यास अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही याकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ तोरणानगर येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक १०४, १०७ व ऊर्दू शाळेची इमारत आहे. या शाळेची इमारत बांधून सुमारे २७ वर्षे झाली असून, सद्य:स्थितीत या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत ही पावसाळ्यात गळत असून, शौचालयाची दुरवस्था झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने शाळेच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच शाळेच्या स्लॅब धोकादायक झाला असून, भिंतींना तडे गेले आहे. यामुळे गेल्या काही महिण्यांपूर्वी शाळेचे स्ट्रक्चर आॅडिट केल्यानंतर धोकादायक ठरविण्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या शिवसेना नगरसेवक रत्नमाला राणे यांनीही शाळेच्या दुरवस्थेबाबत मनपा आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. तसेच प्रभाग व महासभेत आवाज उठविला असतानाही महापालिकेच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असल्याने पालकवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ मनपा प्रशासनातील अधिकाºयांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही नगरसेवक राणे यांनी केला. इमारत बांधण्याबाबत बांधकाम विभाग चालढकल करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नगरसेवक राणे यांनी पुन्हा येत्या महासभेत हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.