‘कोरोना’ची भीती अन् बनावट सॅनिटायझरचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 04:14 PM2020-03-15T16:14:47+5:302020-03-15T16:17:32+5:30
औषध प्रशासनाकडून केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश दिले गेले आहे. सॅनिटायझर विक्रीसाठी औषध दुुकानात ठेवताना त्याचे बिलींग करणे अत्यावश्यक
नाशिक : शहरात सुदैवाने अद्याप एकही कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आल्याची नोंद सरकारी दप्तरी नसली तरी नाशिककर राज्यात वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतीत होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत आहेत. यामुळे शहरात निर्जुंतकद्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. या पार्श्वभुमीवर बाजारात बनावट सॅनिटायझरदेखील विक्रीसाठी दाखल झाल्याने त्याची अधिक भीती निर्माण झाली आहे.
औषध प्रशासनाकडून केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश दिले गेले आहे. सॅनिटायझर विक्रीसाठी औषध दुुकानात ठेवताना त्याचे बिलींग करणे अत्यावश्यक असल्याचेही औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बाजारात बनावट सॅनिटायझरचा छुपा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांच्या दलालांचाही सुळसुळाट झाला आहे. या दलालांकडून औषधविक्रेत्यांना कमी किंमतीत अधिक नफ्याचे आमीष तसेच कुठल्याहीप्रकारच्या बिलाची आवश्यकता नसल्याचे सांगून निकृष्ट दर्जाचे सॅनिटायझर गळ्यात मारण्याचा प्रयत्नही शहरात होत आहे. खासकरून शहरातील सुशिक्षित भाग वगळता गावठाण व शहराजवळच्या खेड्यांमध्ये असे प्रकार होताना दिसत आहे. यामुळे बहुतांश मेडिकलमध्ये उच्चप्रतीचे सॅनिटायझर विक्रीसाठी नसून कमी किंमतीत कधी नव्हे त्या ब्रॅन्डचे सॅनिटायझर विकले जात आहेत. त्यामुळे निकृष्ट सॅनिटायझरच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सॅनिटायझरचा वापर करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुदतबाह्य सॅनिटायझरचा वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.
बनावट सॅनिटायझरची विक्री रोखण्यासाठी औषध प्रशासन, मनपा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय आरोग्यसेवा या शासकिय अस्थापनांकडून संयुक्तरित्या भरारी पथके शहरात कार्यान्वित करण्यात आली आहे. या पथकांचे प्रमुख औषध सहआयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, मनपा आयुक्त असून पथकांद्वारे संशयित ठिकाणी छापेमारी करून बनावट सॅनिटायझरची जप्ती सुरू केली आहे. शहरात अद्याप तीन ठिकाणांहून अशाप्रकारचे निकृष्ट बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यास भरारी पथकांना यश आले आहे.