येवला तालुक्यात यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 10:28 PM2021-04-04T22:28:49+5:302021-04-05T00:45:41+5:30
जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे.
जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कारण करपा, बोगस बियाणे, एक महिन्यापासून अतितीव्र उष्णता व येवला तालुक्यात अनेक भागात पालखेड डावा कालव्याचे आवर्तन उशिरा झाल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची होरपळ झाल्याने शेकडो हेक्टरवरील कांदा संकटात सापडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनात घट येणार आहे.
पंधरा दिवसातून येणारे ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यासह पाऊस, करपा रोग याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर झाला असून मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. उन्हाळी कांद्याने परिपक्व होण्याअगोदर माना टाकल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होत असून मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चातून म्हणावे असे उत्पादन निघणार नसल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच अपरिपक्व कांदा, गारपीटीत सापडलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने त्याचा परिणाम कांदा साठवणुकीवर होणार असल्याने शेतकऱ्यांना आहे त्या भावात कांदा विकावा लागणार आहे.
यावर्षी घरगुती बियाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा शेतकऱ्यांना
आला, चालू हंगाम वाया जातो की काय या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी
मिळेल त्या भावाने बियाण्याची खरेदी केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यात
फसवणूक झाली आहे.
लावले उन्हाळ निघाले लाल,
डोंगळे, जोडकांदा, सफेद कांदा
या पद्धतीने नित्कृष्ट दर्जाचा कांदा निघत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा आहे त्या भावात विक्री करावा लागत असल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे
तर काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी घेतलेले बियाणे लाल कांद्याचे
निघाल्याने देखील अनेकांचे नुकसान झाले.
या संकटाबरोबरच एक महिन्यापासून थंडीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कांदा परिपक्व होण्यावर झाला आहे. पाण्याची कमतरता भासत असून चार दिवसांआड पाणी द्यावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक शेतकऱ्यांची पाण्याअभावी कांदा होरपळ झाली असून त्याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर होत आहे.
फेब्रुवारी महिन्यातील कांदा लागवडी संकटात
यावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका खराब झाल्याने शेतकरी मिळेल त्या ठिकाणी बियाणे घेऊन रोपे तयार करत होता. पर्यायाने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी उशिरा झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवडी केल्या. परंतु त्या कांदा लागवडी अतिउष्ण तापमान, थंडीची कमतरता भासत असल्याने कांद्याचा आकार बारीक झाला असून परिपक्वतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मी पाच एकरावर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. घरचे बियाणे संपुष्टात आल्याने बाजारातून बियाणे खरेदी केले. त्यामध्ये ५० टक्के कांदे लाल निघाल्याने व पाहिजे तशी वाढ न झाल्याने कांदा आहे त्या भावात विकावा लागणार आहे तसेच गेल्या एक महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदा वाढीवर परिणाम झाला असून उत्पादन कमी येणार आहे.
- भाऊसाहेब शिरसाठ, कांदा उत्पादक शेतकरी