धुक्याने वाढवली धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:19 PM2020-01-01T23:19:25+5:302020-01-01T23:20:21+5:30

बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.

Fear increases alarm! | धुक्याने वाढवली धाकधूक!

पिंपळगाव बसवंत परिसरातील द्राक्षबागेवर पहाटे पडलेले धुके.

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात

पिंपळगाव बसवंत : बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.
पावसामुळे अर्धी पिके नष्ट झाली. त्यात बदलते हवामान व दवबिंदूचे दुसरे संकट ओढवले आहे. धुक्यामुळे द्राक्षासह कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने दररोज फवारणी करावी लागत आहे. खर्च वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत मुक्काम ठोकलेल्या पावसाने खरीप हंगामावर अवकृपा केली. या पावसाने हातातोंडाशी आलेली सोयाबीन, टोमॅटो, मका, कांदा आदी पिके सडून गेली. ज्वारी, बाजरी, भात पिकाला कोंब फुटले. या दु:खातून सावरत शेतकºयांनी रब्बी पिके घेतली.
मात्र ढगाळ हवामान व धुक्यामुळे तयार द्राक्षमण्यांना तडे जात आहेत. अवकाळीच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच धुक्यामुळे धाकधूक आणखी वाढली आहे. या धुक्यामुळे द्राक्षांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी दिवसातून दोन-दोन वेळा बुरशीनाशकांची फवारणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. एका फवारणीसाठी एकरी दीड ते दोन हजार रु पयांचा खर्च येतो. त्यामुळे उत्पादन कमी, त्यात खर्चात वाढल्याने शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे.
डाळिंबाला तेल्याचा धोका
द्राक्षासोबत ४० हजार एकरवरील डाळिंबाच्या बागांना ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. सध्याचे वातावरण तेल्या रोगासाठी पोषक असल्याने शेतकºयांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. आधीच गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकºयांना शासकीय मदत मिळालेली नसताना त्यांच्यावर अतिरिक्त फवारणीचा भार पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डाळिंबाचे उत्पादनही ५० टक्क्यांनी घटणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. धुक्यामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे लाल कांद्याच्याही उत्पादनावर ३० टक्क्यांच्या आसपास परिणाम होणार असल्याचा अंदाज कांदा संशोधन विभागाने व्यक्त केला आहे. सोबतच रब्बीचा गहू, हरबरा आणि मका या पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत. तयार झालेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले तर ते द्राक्ष मण्यांच्या दरातसुद्धा जात नाही. यामुळे द्राक्षशेती जोखमीची झाली असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

धुक्यामुळे लाल कांद्याच्या पातीवर करपा येत आहे. त्यावरही फवारणी करण्याची वेळ आली आहे. टमाट्याची पानेही करपून गेली असून, त्यावरही औषधांचा खर्च वाढला आहे. गव्हावरही तांबेरा रोगाची शक्यता बळावली आहे. कोथिंबिर, शेपू वगैरे भाज्यांनाही हे धुके त्रासदायक आहे. पावसामुळे आधीच शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. आता धुक्यामुळे द्राक्षशेतीवर बुरशीजन्य आजारांची शक्यता बळावली असून, दररोज फवारणी करून त्याला आटोक्यात आणणे गरजेचे आहे.
- राकेश सोनवणे, कर्मचारी, द्राक्ष कांदा संशोधन केंद्र

पावसाबरोबरच धुके दहीवर यांचाही पीकविम्यात समावेश करावा. बदलत्या हवामानामुळे बागांचे नुकसान होते. त्यामुळे पीकविम्याचा विचार करताना पावसाचाही विचार करायला हवा.
- सुनील गवळी, शेती सल्लागार

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे द्राक्ष, डाळिंबासह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आता बदललेल्या हवामानाचाही फटका पिकांना बसतो आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.
- अक्षय विधाते, द्राक्ष उत्पादक

Web Title: Fear increases alarm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.