बिबट्याच्या वास्तव्याने भीती ; उपाययोजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:42 AM2019-01-30T00:42:10+5:302019-01-30T00:42:31+5:30
पळसे एमआयडीसीरोडवरील उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरातील ऊसतोड थांबली असून, रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
नाशिकरोड : पळसे एमआयडीसीरोडवरील उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरातील ऊसतोड थांबली असून, रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागानेबिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांना राष्टवाद कॉँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी पळसे एमआयडीसी मार्गावरील गायधनी यांच्या उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळुन आल्याने परिसरात बिबट मादीचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरातील ऊस तोड थांबली असून कामगार भीतीपोटी बसून आहेत. तर मळ्यातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास कोणीही धजावत नाही.
शेतकऱ्यांच्या घराबाहेर बांधलेल्या जनावरांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी व बछड्यांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुळे, युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राजाराम धनवटे, गणेश गायधनी, आसाराम शिंदे, शानू निकम, दीपक वाघ, सोमनाथ बोराडे, कुमार गायधनी, दीपक टावरे आदींच्या सह्या आहेत.