‘सेवाकुंज’ घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
By admin | Published: October 20, 2015 09:06 PM2015-10-20T21:06:39+5:302015-10-20T21:07:53+5:30
‘सेवाकुंज’ घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर थांब्यासमोर रस्त्यावरच पालक आपल्या लहान बालकांना घेऊन उभे राहात असतात. त्यामुळे पंचवटी येथील सेवाकुंज येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वडाळा-पाथर्डी रस्ता लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटीपर्यंत रस्ता तयार करण्यात आला होता. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि दोन्ही बाजूस पादचाऱ्यासाठी पदपथ तयार करण्यात आला आहे. वर्षापूर्वी कलानगर ते पाथर्डीगावापर्यंत राहिलेल्या रस्त्याचे कामास सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच दुभाजकही टाकण्यात आले आहे. श्रद्धा विहार कॉलनीमध्ये दोन महाविद्यालये व एक माध्यमिक विद्यालय, तर समोर एक प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व एक महाविद्यालय आहे. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. तेथे दुभाजकांस छोटा पंक्चर टाकण्यात आला आहे.
हाकेच्या अंतरावरच असलेल्या सार्थकनगर बसथांब्यासमोर इंग्रजी प्राथमिक विद्यालय असून, तेथे दुभाजकास मोठा पंक्चर ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी शाळेची संख्या जास्त तेथे छोटा पंक्चर, तर जेथे एकच शाळा तेथे मोठा पंक्चर टाकण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी असे होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
सार्थकनगर बसथांबासमोर असलेल्या शाळेस वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने सकाळ व दुपार सत्रात शेकडोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे पालक व व्हॅनधारक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळा सुटण्याच्या आधी सुमारे अर्धा तास आधीच वडाळा-पाथर्डी रस्त्यावरच आपली वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीस रस्ता अरुंद पडत आहे; परंतु शाळा सुटल्यावर विद्यार्थी पळत येऊन आपल्या पालकांकडे आणि व्हॅनकडे जातात. त्यामुळे पंचवटी येथील सेवाकुंज येथे झालेल्या दुर्दैवी घटनेची आठवण होते. शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रस्त्यावरच वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा का उभारत नाही? असा प्रश्न निर्माण होतो. (वार्ताहर)