खुल्या जागांवर प्रवेशासाठी अल्प प्रतिसादामुळे इंग्रजी शाळांना आरटीईचा टक्का वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 03:37 PM2020-07-28T15:37:11+5:302020-07-28T15:42:05+5:30
कोरोनाच्या भीतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कोट्यातून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईचा टक्का वाढण्याची भीती शाळाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने सद्यस्थितीत शाळांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला आहे.
नाशिक : कोरोनाच्या भीतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कोट्यातून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईचा टक्का वाढण्याची भीती शाळाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने सद्यस्थितीत शाळांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत शाळांचे गाऱ्हाणे पोहोचविले जाणार असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.
नाशिकच्या ४४७ शाळांसह राज्यभरात ९ हजार ३३१ खासगी विनाअनुदानित शाळांमधील ११ लाख ५४ हजार ४४९ राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. आतापर्यंत यापैकी केवळ १७ हजार १३५ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू असताना महाराष्ट्र राज्य इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे प्रतिवर्षीच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प प्रवेश होत आहे. अनेक पालकांकडून साळा सुरू झाल्यानंतरच प्रवेश घेणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून गेल्या वर्षाच्या पटावर आधारित २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या तुलनेत वाढण्याची भीती इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोर निर्माण झाली आहे. अशाप्रकारे विसंगती निर्माण झाली तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शालेय शुल्कातून मिळणाºया उत्पन्नात घट होऊन शाळा चालविणे कठीण होणार असल्याचे कारण देत इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने संंपूर्ण राज्यभरात आरटीईची प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला असल्याची माहिती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. प्रिन्स शिंदे यांनी दिली आहे.