पिके वाया जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:47 PM2019-09-20T22:47:36+5:302019-09-21T00:41:54+5:30
नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, मूग बहरला आहे, तर काही ठिकाणी टमाट्याची खुडणी सुरू आहे.
एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, मूग बहरला आहे, तर काही ठिकाणी टमाट्याची खुडणी सुरू आहे. काही भागात फ्लॉवरची निंदणी शेतकरी सहकुटुंब करीत आहेत. सध्या सुरू असलेली पावसाची रिपरिप आणि मजुरांचा वानवा असल्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरीच सर्व कामे उरकावी लागत आहेत. काही ठिकाणी अजूनही शेतातून पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे तेथील पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
एकलहरे गाव, हिंगणवेढे परिसरात द्राक्षबागांची छाटणी सुरू झाली आहे. सामनगाव परिसरात सखल भागात अति पावसामुळे शेतांमध्ये पाणी उफाळून आल्याने काही प्रमाणात पिके पाण्याखाली आहेत. ही पिके चिखल व पाण्यामुळे सडून जाण्याची भीती सामनगावचे शेतकरी पप्पू राणू जगताप यांनी व्यक्त केली. गंगावाडी शिवारात मूग आणि भुईमूग ही पिके बहरू लागली आहेत, तर उसाला पुरेसा पाऊस मिळाल्याने त्याची वाढही जोमाने होऊ लागली आहे.
एकलहरे परिसरातील सामनाव, चाडेगाव, कोटमगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चांदीगरी, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने नद्या, नाले, विहिरी, तलाव तुडुंब भरले आहेत. काही ठिकाणी अजूनही शेतातून पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे तेथील पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
एकलहरे, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी या भागात सोयाबीन पिकाला शेंंगा आल्या आहेत. या शेंगातून दाणे भरण्याची प्रक्रि या सुरू आहे. सोयाबीनची पिके उभी आहेत. अजून सुमारे दीड महिन्यानंतर सोयाबीन काढणीस येईल, असे शेतकरी तानाजी ढोकणे यांनी सांगितले. पूर्व भागात काही ठिकाणी काकडीचे पीकही जोमाने बहरले आहे. काकडी लावून सुमारे महिना भराचा कालावधी उलटला. काकडीचे वेल पसरून बहर चांगला येण्यासाठी सरीच्या दोन्ही टोकांवर बांबू खोचण्यात आले आहेत.
मूग, भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात
सामनगाव, हिंगणवेढे, जाखोरी, चांदगिरी या भागांत टमाटे लागवड होऊन सुमारे तीन महिने झाले आहेत. सध्या टमाट्याचा खुडवा सुरू आहे. गवार, भेंडी, शेपू, पालक, मेथी, कांदापात या भाज्यांची काढणी करून नाशिकरोड, नाशिक येथील भाजीबाजारात विक्र ीसाठी नेला जातो. कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चाडेगाव शिवारात अनेकांनी मूग व भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सुमारे दीड ते दोन महिन्यांनी ही पिके काढण्यास येतील.