बापाच्या शारीरिक अत्याचारास कंटाळून मुलीने '११२' डायल केला अन्...; नाशिकमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:38 PM2022-04-09T13:38:56+5:302022-04-09T13:57:15+5:30

नाशिक - बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने येवला तालुका हादरला. पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीने ‘घरात भांडण झाले असून आम्हाला ...

Fed up with father's physical abuse, daughter dials '112' In Nashik | बापाच्या शारीरिक अत्याचारास कंटाळून मुलीने '११२' डायल केला अन्...; नाशिकमधील प्रकार

बापाच्या शारीरिक अत्याचारास कंटाळून मुलीने '११२' डायल केला अन्...; नाशिकमधील प्रकार

Next

नाशिक- बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने येवला तालुका हादरला. पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीने ‘घरात भांडण झाले असून आम्हाला मदत द्या’ असा कॉल डायल-११२ या हेल्पलाइनवर दिला. पीडितेने सांगितलेल्या घराच्या पत्त्यावर पोलीस पोहोचले असता तो पत्ता भलताच निघाला. यानंतर ग्रामीण पोलिसांना या कॉलचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळाले. पोलिसांनी जीपीएसद्वारे या टॉवर लोकेशनला ट्रॅक करत त्या पीडित मुलीचे घर शोधून काढले. यावेळी मुलीला जेव्हा पोलिसांनी माहिती विचारली, तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती.

महिला पोलिसांनी तिला धीर देत वाहनात बसविले आणि विश्वासात घेत चौकशी केली असता तिच्या सख्ख्या बापाकडून वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले जात असल्याची आपबिती पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने पोलिसांना जेव्हा सांगितली, तेव्हा पोलीसही हादरून गेले. तपासी पथकाने तत्काळ याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने येवला पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी पीडितेच्या गावात जात तिच्या संशयित बापाला गुरुवारी संध्याकाळी बेड्या ठोकल्या. या संशयिताने मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिला जिवे ठार मारण्याची धमकी देत अज्ञानपणाच्या गैरफायद्यातून बळजबरीने शरीरसंबंध स्थापित केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. येवला शहर पोलीस ठाण्यात संशयित बापाविरुद्ध बलात्कार, पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपत्कालीन स्थितीत ‘१००’ ऐवजी फिरवा ‘११२’

या गंभीर प्रकरणाला केवळ ‘डायल ११२’ या आधुनिक सेवेमुळे वाचा फुटली. यामुळे अत्यंत आपत्तीजनक व आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी पोलीस मदत मिळविण्यासाठी १०० ऐवजी ११२ हा क्रमांक फिरवावा, जेणेकरून पोलिसांना अचूक लोकेशन मिळते आणि तत्काळ मदत देणे सोपे होते, असे आवाहन सचिन पाटील यांनी नाशिक शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ७) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे.

Web Title: Fed up with father's physical abuse, daughter dials '112' In Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.