पुष्पोत्सवाच्या प्रदर्शनातून गुलशनाबादची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:27 AM2020-02-22T00:27:23+5:302020-02-22T01:15:06+5:30
फुलांचे विविध प्रकार, तबकात फुललेले बगिचे, शिवाय पुष्परांगोळ्या आणि जोडीला फुलदाणीतील सजावट तसेच अनेक वर्षांचे परंतु कुंडीत ठेंगणीच राहिलेली बोन्साय! निसर्गातील फळा-फुलांच्या उत्सवामुळे पुष्पोत्सवात रंग भरला. शिवरात्रीच्या सुटीचे औचित्य साधून नाशिककरांनी गुलशनाबादची अनुभूती शुक्रवारी (दि.२१) घेतली.
नाशिक : फुलांचे विविध प्रकार, तबकात फुललेले बगिचे, शिवाय पुष्परांगोळ्या आणि जोडीला फुलदाणीतील सजावट तसेच अनेक वर्षांचे परंतु कुंडीत ठेंगणीच राहिलेली बोन्साय! निसर्गातील फळा-फुलांच्या उत्सवामुळे पुष्पोत्सवात रंग भरला. शिवरात्रीच्या सुटीचे औचित्य साधून नाशिककरांनी गुलशनाबादची अनुभूती शुक्रवारी (दि.२१) घेतली.
शहरी भागात पर्यावरणाचे महत्त्व वाढावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत पुष्पोत्सव भरविण्यात येतो. त्यानिमित्ताने शहरी भागात फुललेल्या फुलांची आणि अन्य माहिती नागरिकांना मिळते आणि तीन-चार दिवस पर्यावरणाच्या प्रबोधनात जातात. काही कारणामुळे गेल्या आठ वर्षांपासून खंड पडलेला पुष्पोत्सव पुन्हा सुरू झाला आहे. गेल्यावर्षीनंतर यंदाही राजीव गांधी भवनात भरलेल्या या उत्सवाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्पर्धात्मक पुष्पप्रदर्शन असल्याने विविध आठशे स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. यानिमित्ताने गुलाबासह विविध फुलांचे प्रकार, बहुमोसमी तसेच वर्षातून एकदा फुलणारी फुले प्रदर्शनात आहेत, परंतु फुलांच्या सजावटीने विविध प्रकारच्या रचना सादर करण्यात आल्या आहेत. जपानी पुष्परचनेबरोबरच फुलांच्या रांगोळ्यादेखील असून, फळे आणि फळभाज्यांचे विविध प्रकारदेखील सादर करण्यात आले आहेत. भाज्यांच्या मदतीने देखावे तयार करण्यात आले आहेत. हे सर्व पाहण्यासाठी शुक्रवारी (दि. २१) आबालवृद्धांची गर्दी झाली होती. प्रसाद दुसाने यांच्या सहकाऱ्यांच्या साथसंगतीने पुष्पोत्सवात अधिकच रंग भरले. फ्लॉवर टॉवरसह अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंटदेखील उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन वृक्ष प्राधिकरण समितीचे सभापती तथा आयुक्त राधाकृष्ण गमे, उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले तसेच समितीच्या सदस्यांनी केले आहे.