‘तबला चिल्ला’ने दिली नादब्रह्मची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:29 AM2020-01-18T01:29:57+5:302020-01-18T01:30:23+5:30
कायदे, रेले, पेशकार, परण आदी प्रकारांनी झालेल्या तबलावादनाने तबला चिल्लाचा पहिला दिवस चांगलाच रंगतदार ठरला. अखंड नाद संकीर्तनाच्या अनोख्या ‘तबला चिल्ला’मधून उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नादब्रह्मची अनुभूती घेतली.
नाशिक : कायदे, रेले, पेशकार, परण आदी प्रकारांनी झालेल्या तबलावादनाने तबला चिल्लाचा पहिला दिवस चांगलाच रंगतदार ठरला. अखंड नाद संकीर्तनाच्या अनोख्या ‘तबला चिल्ला’मधून उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नादब्रह्मची अनुभूती घेतली.
कुसुमाग्रज स्मारकात आदिताल तबला अकादमीच्या वतीने सुरू झालेल्या तबला चिल्लाचे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक अनिश प्रधान, पं. ओंकार गुलवाडी, कमलाकर वारे, पं. नाना मुळे, किरण देशपांडे, प्रा. अविराज तायडे, लोकेश शेवडे, आनंद सिधये, नितीन वारे, रघुवीर अधिकारी, मानसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत पार पडले. सहा वर्षांपासून नाशिकमध्ये रसिकांना पसंतीस उतरलेला तबला चिल्ला हा कार्यक्रम सदाबहार तबलावादनाने पार पडला. तबला चिल्लाच्या पहिल्या सत्रात जुहेब अहमद खान यांनी फरुखाबाद घराण्यातील विविध तुकडे पेश करताना तीन तालातील पेशकार, कायदे पेश केले. यावेळी त्यांनी पारंपरिक बंदिशीसोबतच हबीबुद्दिदिन खॉ साहेब, उस्ताद अल्लारखॉ साहेब यांच्या काही चीजा वाजवून दाखिवल्या. त्यांना पुष्कराज भागवत यांनी संवादिनीवर साथ केली. दुसऱ्या सत्रात नाशिकचे दिगंबर सोनवणे यांनी उस्ताद थिरकवॉ
साहेब यांच्या पारंपरिक बंदिशीतील कायदे, रेले, परण तीन तालात सादर केले.