प्रामाणिक रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सत्कार
By admin | Published: October 26, 2015 10:52 PM2015-10-26T22:52:47+5:302015-10-26T22:58:03+5:30
प्रामाणिक रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सत्कार
नाशिकरोड : रिक्षामध्ये विसरून गेलेले दहा तोळे सोन्याचे दागिने व रोकड संबंधित महिलेला प्रामाणिकपणे देणाऱ्या रिक्षाचालकाची सविस्तर बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या वतीने संबंधित रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून रिक्षाने सामनगाव येथे घरी गेलेल्या कल्याबाई शिवाजी आव्हाड या घाईगडबडीत आपले दहा तोळे सोन्याचे दागिने व रोकड असलेली पिशवी रिक्षातच विसरून गेल्या होत्या. काही वेळाने कल्याबाई यांना सोन्याच्या दागिन्यांची पिशवी रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल उबाळे यांच्या मदतीने संबंधित रिक्षाचालक गौरव भरत सोनवणे याला शोधून
काढले.
यावेळी रिक्षाचालक गौरव याने रिक्षात विसरून गेलेली पिशवी न उघडता घरात व्यवस्थित ठेवली होती. गौरव याने लागलीच ती दहा तोळे सोन्याचे दागिने व रोकड असलेली पिशवी कल्याबाई यांना दिली. प्रामाणिकपणाबद्दल गौरव याला देऊ केलेले पाचशे रुपयांचे बक्षीससुद्धा नाकारले होते. यावेळी शिवाजी भोर, नितीन चिडे, अशोक संगमनेरे, इरफान शेख, नारायण भंडारे, जितू तुंगार, शांताराम घायवट, ज्ञानेश्वर ताजनपुरे, दीपक धर्माधिकारी, संतोष बच्छाव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)