नामपूरला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
By admin | Published: March 22, 2017 12:21 AM2017-03-22T00:21:43+5:302017-03-22T00:21:56+5:30
नामपूर : येथे श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रतिष्ठान व नामपूर लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ यांच्या विद्यमाने महिलांचा गौरव सोहळा घेण्यात आला.
नामपूर : येथे श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रतिष्ठान व नामपूर लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील गुणवंत ११ महिलांचा गौरव सोहळा, स्नेहमेळावा व सांस्कृतिक महोत्सव असा एकत्रित कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विठामाई रामकृष्ण अलई होत्या. या सोहळ्यात महाराष्ट्र व गुजरात राज्यातील महिलांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे स्वरूप व उद्दिष्ट प्रतिष्ठानच्या सरचिटणीस स्नेहलता नेरकर यांनी विशद केले. या महोत्सवात मुंबई, पुणे, डोंबिवली, नाशिक, सूरत, कळवण, मालेगाव, निजामपूर, पिंपळनेर, सटाणा, नामपूर व जायखेडा येथील महिलांनी सहभाग नोंदवला. या महिला मेळाव्यात सांस्कृतिक महोत्सवाबरोबरच लग्नासमारंभातील अनिष्ट चालीरीती, हुंडापद्धती, व्यापार व शेतीक्षेत्रातील मुलांकडे वधुपित्याचे होणारे दुर्लक्ष व त्याचे अनिष्ट परिणाम या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात महाराष्ट्रातील ११ गुणवंत महिला प्रा. विमल वाणी, डॉ. सौ. उषा बागडे, प्रा. रत्ना दहिवेलकर (पुणे), रत्नमाला राणे (नाशिक), साधना राणे (निजामपूर), पूनम ततार, कमल नेर, सविता नेर, रेखा मालपुरे (डोंबिवली), रजनी राणे यांचा आमदार दीपिका चव्हाण व सीमा सोनजे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी महिलांनी अधिक सक्षम होऊन नवीन प्रवाहात स्वत:ला जुळवून घेऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन आमदार दीपिका चव्हाण यांनी केले. या महोत्सवात ३१८ महिलांनी विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला, तर ८४५ स्त्रियांनी या स्नेहमेळाव्यातील विविध चालीरीतीवरील चर्चेत सहभाग घेतला. गुजरात राज्यातील सूरतच्या महिला मंडळाने गरबा नृत्य सादर करून ‘वन्स-मोअर’ मिळविला, तर नामपूर, पिंपळनेर, जायखेडा, मालेगाव येथील सांस्कृतिक महोत्सवातील गीते मनोवेधक ठरली. या कार्यक्रमात आमदार दीपिका चव्हाण, नाशिकच्या नगरसेवक रत्नमाला राणे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा सोनजे, पूनम ततार, स्नेहलता नेरकर, उषा बागडे आदिंनी महिलांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)