मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
By admin | Published: June 25, 2016 10:06 PM2016-06-25T22:06:18+5:302016-06-26T00:34:07+5:30
मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
नाशिकरोड : मन, मेंदू व मनगटाचा विकास शिक्षणातून होत असतो. मात्र आजचे शिक्षण केवळ करियर प्राप्तीचे एक साधन बनले असून, देशास महासत्ता बनविण्यासाठी आवश्यक चारित्र्यवान पिढी बनविण्यासाठी कमी पडत आहे, असे मत नवनियुक्त नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले.
चेहेडी बुद्रुक येथील मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अनंत आमुची ध्येयासक्ती.. तरुणांचा आशावाद या विषयावर बोलताना विकास नवाळे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, खुदीराम बोस यांसारख्या थोरांनी आपल्या आयुष्याच्या उमेदीच्या काळातच कर्तृत्व घडविल्याने त्यांची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांत झाली. आजच्या युवा पिढीलाही याच आदर्शाचे पालन करणे गरजेचे आहे. करियर घडविण्याच्या ओढाताणीत माणूस बनण्यासाठी आवश्यक व्यक्तिमत्त्वाचा विकास आपल्या पाल्यात होण्यासाठी पालकांनी कटाक्षाने लक्ष घातले पाहिजे, असे प्रतिपादन नवाळे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट व नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेले अरुण भिसे, शरद गायधनी, अश्विनी टिळे, इरफान शेख, नेहा चव्हाण व विविध शाळांतील दहावीतील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब बोराडे व सूत्रसंचालन गजानन चव्हाण यांनी केले. यावेळी बापू ताजनपुरे, रेवण कांगणे, सचिन सोर, धनंजय सरक, दत्तात्रय अलगट, डॉ. शरद गायकवाड, सचिन चिखले, अनिल गायखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)