स्त्री रुग्णालय; मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:40 PM2017-10-17T23:40:28+5:302017-10-18T00:11:37+5:30
शासन अनुदानातून साकारल्या जाणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालय प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला आणि पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा सांगावा आणत वसंत गिते यांना नमते घेण्यास भाग पाडले. मंगळवारी (दि. १७) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच लगोलग महासभेचा ठराव नगरसचिव विभागाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आणि त्याची प्रत आमदार देवयानी फरांदे यांच्या हाती सुपूर्द करत रुग्णालयाच्या वादावर पडदा टाकण्यात आला.
नाशिक : शासन अनुदानातून साकारल्या जाणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालय प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला आणि पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा सांगावा आणत वसंत गिते यांना नमते घेण्यास भाग पाडले. मंगळवारी (दि. १७) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच लगोलग महासभेचा ठराव नगरसचिव विभागाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आणि त्याची प्रत आमदार देवयानी फरांदे यांच्या हाती सुपूर्द करत रुग्णालयाच्या वादावर पडदा टाकण्यात आला. शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यात वाद सुरू होता. विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या प्रभागातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची सुमारे १० हजार चौरस मीटर जागा स्त्री रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आमदार फरांदे यांनी महापालिकेपुढे मांडला होता. मात्र, गिते यांनी त्यास विरोध दर्शवित स्त्री रुग्णालयासाठी टाकळीरोड येथील जागा सुचविली होती. केवळ जागाच सुचविली नाही, तर गिते यांनी उपसूचना देत तसा ठराव करत तो शासनाकडे पाठवून देण्याचीही तत्परता दाखविली होती. परंतु, या प्रकाराने आमदार फरांदे संतप्त झाल्या होत्या. त्यांनी महापौरांसह पदाधिकाºयांना त्याचा जाबही विचारला होता. दरम्यान, सोमवारी (दि. १६) झालेल्या महासभेत भाजपाच्या सदस्य सुप्रिया खोडे यांनी भाभानगर येथील जागाच स्त्री रुग्णालयाला देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे महापौर नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून होते. परंतु, मंगळवारी (दि. १७) नाशिक दौºयावर आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच त्याचा निकाल लावला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्री रुग्णालय प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याचे पालकमंत्र्यांनी गिते यांना सांगितले व प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांचाच आदेश आहे म्हटल्यावर गितेंचा नाइलाज झाला आणि फरांदे यांच्या बाजूने कौल गेला. त्यानुसार, पालकमंत्र्यांनी महापौरांना तातडीने सदरचा ठराव नगरसचिव विभागाकडे पाठविण्याची सूचना केल्यानंतर गटनेता व सभागृहनेता यांच्या स्वाक्षरीने लगोलग ठराव रवाना करण्यात आला आणि त्याची एक प्रतही तातडीने पालकमंत्र्यांसह आमदार देवयानी फरांदे यांच्या हाती सुपूर्द केल्याचे समजते. दरम्यान, या प्रकारात माघार घ्यावी लागल्याने गिते नाराज झाल्याची चर्चा असून, उपमहापौर गिते यांनीही बैठकीतून निघून जाणे पसंत केले.