माणुसकीला काळीमा! 'नकोशी'ला चक्क घंटागाडीतून पोहचविले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
By अझहर शेख | Published: October 29, 2022 12:52 PM2022-10-29T12:52:52+5:302022-10-29T12:53:26+5:30
नाशिकच्या खत प्रकल्पामध्ये सापडले स्त्री जातीचे अर्भक!
नाशिक : एकीकडे 'बेटी बचाव बेटी पढाव...' चा नारा बुलंद केला जात असताना नाशिकच्या खत प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा एका 'नकोशी'ला टाकून अज्ञात महिलेने पळ काढण्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका स्त्री जातीचे अर्भक चऱ्याच्या ढिगार्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कचरा वेचणाऱ्या कामगारांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळविली.
महिला सबलीकरणासठी तसेच विवाहितांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विविध प्रयत्न होत आहे. गर्भपातलादेखील न्यायालयाने 'हिरवा झेंडा' दाखविला आहे. अविवाहित महिलासुद्धा गर्भपात करून घेऊ शकते, असे न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही अवैधरित्या अशाप्रकारे बाळांना जन्माला घालून असे बेवारसपणे उघड्यावर फेकून देण्याचे प्रकार घडतच आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने गौळाणे खत प्रकल्पातील कचऱ्यात सापडलेल्या अर्भक कोणत्या घंटागाडीत कोणी टाकले याच्या तपासाला पोलिसांनी गती दिली. दिवाळीचे लक्ष्मीपूजन होऊन चार दिवस उलटत नाही तर स्त्री जातीचे अर्भक खत प्रकल्पातील कचऱ्यात सापडल्याने गौळाणे, पाथर्डी फाटा, इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत क्रूर व अमानवी अशा या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी (दि.28) सकाळी खत प्रकल्पाच्या कचऱ्यात कचरा गोळा करताना एका प्लास्टिकच्या पिशवीत कापडमध्ये गुंडाळून ठेवलेले स्त्री जातीचे अर्भक सापडले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. त्यानुसार सकाळी शहरातून कोण-कोणत्या भागातून कचरा संकलन करून घंटागाड्या खत प्रकल्पात आल्या? याबाबतची माहिती मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनकडून पोलीस घेत आहेत. घंटागाडीवरील कामगारांची चौकशी करण्यात येत आहे.