इंजेक्शन देताना डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:53+5:302020-12-22T04:14:53+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोटात दुखत असल्याने रविवारी (दि. २०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास परिसरातील सादिकनगरच्या ४ ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोटात दुखत असल्याने रविवारी (दि. २०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास परिसरातील सादिकनगरच्या ४ क्रमांकाच्या गल्लीत असलेल्या डॉक्टर मुश्ताक यांच्या दवाखान्यात आपल्या दोन शाळकरी मुलांसोबत उपचारासाठी गेली. यावेळी डॉक्टरने पीडितेला ‘क्या खायें थे’ असे विचारून इंजेक्शन घ्यावे लागेल, असे सांगितले. यावेळी पीडितेने गोळ्या द्या, इंजेक्शन नको ,असे संशयित शेख यांना सांगितले. मात्र, त्यांनी नकार देत इंजेक्शनचा तगादा लावला. यावेळी पीडितेने ‘दंडावर इंजेक्शन द्या’, असे सांगितले असता, त्यांनी नकार देत कमरेवरच इंजेक्शन घ्यावे लागेल, असे सांगून इंजेक्शनच्या बहाण्याने अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. यानुसार इंदिरानगर पोलिसांनी संशयित डॉक्टर शेखविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉक्टर शेख यानेसुद्धा पीडितेच्या नातेवाईकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व दवाखान्याचे नुकसान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.
--इन्फो--
डॉक्टरकडून कात्रीने वार
पिडित महिलेने आरडाओरड केल्यानंतर दवाखान्याबाहेर एका चहाटपरी चालविणाऱ्या महिलेने दवाखान्यात धाव घेतली. यावेळी पिडितेने डॉक्टरच्या कृत्य तिला सांगितले. तिने पिडितेला बाहेर आणून त्यांच्या नातेवाईकांनी घडलेला प्रकार सांगितला. यावेळी महिलेच्या पुरुष नातेवाईकांनी दवाखान्यात प्रवेश करत डॉक्टरांना जाब विचारला आणि गोंधळ घालत डॉक्टरला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टर शेख याने दवाखान्यातील कात्री घेत त्या युवकांना मारण्याचा प्रयत्न केला असता झटपटीत दोघांच्या हातांना कात्री लागल्याने जखमा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.