नाशकात ‘बाईक रॅली’द्वारे स्त्री शक्तीचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:37 PM2018-08-10T12:37:35+5:302018-08-10T12:38:31+5:30
रॅलीत वाहतुकीचे नियम, प्लॅस्टिक बंदी, महिला सक्षमीकरण याविषयी संदेश
नाशिक-गारव्यासह आल्हाददायक सकाळ, महिलांनी आवर्जुन परिधान केलेले ‘तिरंग्या’तील रंगसंगतीचे पोषाख, डोक्यावर केशरी फेटा, स्त्री शक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर या साऱ्यांमुळे वातावरण भारावून गेले होते. निमित्त होते ‘महिला बाईक रॅली’चे. येथील कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था व सॅव्ही वुमेन्स कॉलेज यांच्यामार्फत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत शुक्रवारी (दि.१०) या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपायूक्त माधुरी कांगणे, संस्थेच्या सुनिता मोडक, श्रृती भुतडा, सोनल मंडलिक, संजु मित्तल, अनुपा वराडे,पुनम आचार्य आदि मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात फुगे सोडून कालिदास कलामंदिर येथुन रॅलीला प्रारंभ झाला. तेथुन शालीमार, नेहरु गार्डन, एमजी रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रावसाहेब थोरात सभागृह या मार्गे रॅली गेली. रॅलीत महिलांनी विविध आकर्षक वेशभुषा करत, वाहतुकीचे नियम, प्लॅस्टिक बंदी, महिला सक्षमीकरण याविषयी संदेश देत जनजागृती केली. भारताची ओळख ठरलेल्या नामवंत महिलांची रुपये यावेळी साकारण्यात आली होती. रावसाहेब थोरात सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी लविना थवर, बिट्टी पटेल, अश्विनी देशपांडे, निधी वैश्य, किर्ती किर्तने, मोनालिसा जैन, मिनल ठाकुर, दर्शना सराफ यांच्यासह महिला मोेठ्या संख्येने उपस्थित होत्या.