हरिहर किल्ल्यावरून पडल्याने महिला पर्यटकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:04 AM2020-11-30T01:04:06+5:302020-11-30T01:04:32+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील रूपाली ज्ञानेश्वर चौधरी (३५) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली या आपल्या कुटुंबासोबत खासगी वाहनाने फिरायला आल्या होत्या. त्यांनी निरगुडपाड्याच्या बाजूने हरिहर किल्ल्यावर चढण्याची सुरुवात केली. किल्ल्यावर जात असताना एका ठिकाणावर फोटो काढत असताना रूपाली यांचा पाय घसरला आणि दगडावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे वृत्त समजताच किल्ल्याच्या परिसरात असलेले वनरक्षक दिवे आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हरिहर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो. चढाई करण्यास अतिशय कठीण मानला जाणाऱ्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या थेट कातळात कोरलेल्या असल्यामुळे थेट अंगावर येणाऱ्या असल्याने घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. किल्ला चढत वा उतरत असताना खोल दऱ्या पाहून डोळे गरगरून अपघात होण्याची दाट शक्यता असते.
------------------------------------------------------------
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
चढाईसाठी अतिशय कठीण असलेल्या हरिहर किल्ला पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षक ठरला आहे; परंतु थेट कातळात कोरलेल्या पायऱ्या असल्यामुळे येथे चढाई केल्यानंतर अनेकांचे खाली पाहिल्यानंतर डोळे गरगरणे साहजिकच आहे. महिला पर्यटकाच्या मृत्यूनंतर मात्र पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
------------------------------------------------------------
जीवघेणे साहस टाळावे : प्रशासनाचे आवाहन
पर्यटकांसाठी आव्हान असलेल्या हरिहर किल्ल्याची भ्रमंती करताना पर्यटकांनी जीवघेणे साहस करू नये. हरिहर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अवघड असलेल्या किल्ल्यावर पर्यटक आपल्या कुटुंबासोबत दुर्गभटकंती करण्यासाठी येत असतात. अनेक जणांना अवघड वाटा व मार्ग माहीत नसताना किल्ला चढण्याचा प्रयत्न करतात. आकर्षक ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. परिणामी दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे निसर्गपर्यटन करणाऱ्यांनी साहस करणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
-----------------------------------------------------------------
२९ रुपाली चौधरी