महिला उद्योजकांची जागतिक पातळीवर भरारी
By admin | Published: April 6, 2017 01:52 AM2017-04-06T01:52:09+5:302017-04-06T01:52:23+5:30
नाशिक : येथील महिला उद्योजकांनी टिश्यू पेपरला पर्याय शोधत परवडणाऱ्या दरात कॉटनच्या प्रीमिअम हातरुमालचे उत्पादन करण्यात यश मिळविले आहे
नाशिक : येथील महिला उद्योजकांनी टिश्यू पेपरला पर्याय शोधत परवडणाऱ्या दरात कॉटनच्या प्रीमिअम हातरुमालचे उत्पादन करण्यात यश मिळविले आहे.
नुकताच वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इंडस्ट्रिज यांच्या मुंबईत पार पडलेल्या ग्लोबल समीटमध्ये ‘एक्सलन्स इन वुमन स्टार्टअप बिझनेस अॅन्ड इनोव्हेशन’ पुरस्काराने डॉ. श्रद्धा लुनिया आणि वैशाली वाघ या दोघींचा सन्मान करण्यात आला आहे.
आज आपण सगळीकडे टिश्यू पेपरचा सर्रास वापर होताना पाहतो, मात्र याच पेपरच्या निर्मितीकरता जगभरात दिवसाला लाखो झाडांवर कुऱ्हाड पडत असते. हा विषय या दोघी उद्योजिकांनी डोळ्यासमोर ठेवत त्याला पर्याय शोधून काढला. कॉटनच्या हातरुमालचे उत्पादन त्यांनी सुरू केले. आज यातून महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील तीनशे महिलांचे नेटवर्क त्यांनी उभारले आहे.
हातरुमालकडे ब्रॅँड म्हणून अजून कोणीही लक्ष केंद्रित केलेले नाही, ही बाब लक्षात घेत डॉ. श्रद्धा लुनिया आणि वैशाली वाघ यांनी ब्रॅँड म्हणून याकडे लक्ष वेधण्याचे ठरविले. गतवर्षी आठ महिने त्यावर संशोधन आणि विकास कार्यक्रम चालविला व एक आगळेवेगळे आणि टिश्यू पेपरला पर्याय देणारे शंभर टक्के कॉटनपासून तयार होणारे उत्पादन सुरू केले. अॅँटीबॅक्टेरिया यांसारख्या विविध प्रकारात ते बाजारात आणले. आज या ब्रॅँडचे हे उत्पादन राज्यासह परदेशातील बाजारपेठांमध्ये पोहोचले आहे. (प्रतिनिधी)