दुसऱ्या पर्वणीतील बंदोबस्ताचे फेरनियोजन
By admin | Published: September 7, 2015 11:36 PM2015-09-07T23:36:43+5:302015-09-07T23:50:35+5:30
सुधारणा : शहरांतर्गत बससेवा, दुकाने सुरू; दुचाकींसाठी वाहनतळ
नाशिक : भाविक व नागरिकांनी गर्दी किंवा बॅरिकेडिंगची भीती न बाळगता दुसऱ्या सिंहस्थ पर्वणीत स्नानासाठी बाहेर पडावे, त्यांच्या सेवेसाठी शहरात अंतर्गत बससेवा, दुकाने सुरू राहणार असून, स्थानिकांच्या दुचाकींसाठी वाहनतळाची व्यवस्था फेरनियोजनात करण्यात आल्याची माहिती माहिती पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़
पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, पहिल्या पर्वणीनंतर स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, व प्रसारमाध्यमांनी केलेल्या सुचनेनुसार फेरबदल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये भाविक व स्थानिकांच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून बंदोबस्ताचे फेरनियोजन केले आहे़ १९ सप्टेंबर रोजी दुसरी पर्वणी असून, यासाठी मोठ्या संख्येने साधू-महंत व भाविक येतील असा अंदाज आहे़
पोलीस बंदोबस्तातील फेरनियोजनात वाहतुकीचे मार्गनिहाय नियोजन अर्थात बाह्यमार्ग, अंतर्गत बसस्थानक, नाशिक शहर बससेवा, भाविकांच्या संख्येनुसार अंतर्गत बसस्थानक ते घाटापर्यंतचा मार्ग असे नियोजन करण्यात आले आहे़ भाविकांच्या गर्दीनुसार पोलिसांनी दोन आराखडे ‘अ’ व ‘ब’ तयार केले आहेत़ शहरातील बॅरेकेडींग ही मुव्हेबल स्वरुपाची असून, ती ‘नो एंट्री पॉर्इंट’पासून लावली जाणार आहे़ या व्यतिरिक्त शहरातील बहुतांशी रस्ते हे वाहतुकीसाठी खुले असणार आहे़