मेथी, कोथिंबीर आली ५ रुपये जुडीवर; आवक वाढल्याचा परिणाम, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
By संजय दुनबळे | Published: August 5, 2023 03:12 PM2023-08-05T15:12:04+5:302023-08-05T15:12:14+5:30
बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून शेतमालाची आवक वाढली आहे.
पंचवटी : पंधरवड्यापूर्वी वाढत्या बाजारभावामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या मेथी तसेच कोथिंबीरची मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजार घसरले असून गुरुवारी (दि.३) लिलावात आलेल्या शेतमालाला ५ रुपये प्रति जुडी बाजारभाव मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तर उत्पादक शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शेतातील पीक काढणे सोपे झाले आहे. शिवाय पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने मेथी आणि कोथिंबीर मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून शेतमालाची आवक वाढली आहे. मात्र बाजारभाव घसरल्याने लागवड दळणवळण खर्च देखील न सुटल्याने काही शेतकऱ्यांनी काल बुधवारी (दि.२) सायंकाळी बाजार समितीत मेथी, कोथिंबीर काही माल सोडून घराकडे मार्गक्रमण केले.
गुरुवारी सायंकाळी बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झालेल्या मेथी आणि कोथिंबीर प्रति जुडीला ५ ते २० रुपयांपर्यंत दर मिळाला, तर कांदापात आणि शेपू भाजीचे दर टिकून होते. लिलावात शेपू १५, तर कांदापात २५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.