मेथीचे दर कडाडले;
By admin | Published: October 6, 2015 11:59 PM2015-10-06T23:59:11+5:302015-10-07T00:01:32+5:30
७५ रुपये जुडी आवक घटली : पितृपक्षामुळे मागणी वाढली
पंचवटी : दोन दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा परिणाम उभ्या पिकावर झाल्याने मेथीच्या भाजीची आवक घटली आहे. पावसामुळे एकीकडे आवक घटली असली तरी सध्या पितृपक्ष सुरू असल्याने मेथीच्या भाजीला मागणी वाढल्याने दर कडाडले आहेत.
सोमवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी जुडीची आवक अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने प्रति जुडीला ७५ रुपये असा विक्रमी बाजारभाव मिळाला. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने जेवण बनविताना मेथीची भाजी लागते. त्यामुळे या भाजीला मागणी वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतमाल खराब झाला, तर काही ठिकाणच्या भागात शेतकऱ्यांना तयार शेतमाल काढता आला नसल्याने बाजार समितीत येणारी मेथी जुडीची आवक घटली आहे.
मेथी जुडीची आवक घटली असली तरी, गेल्या काही दिवसांपासून पितृपक्ष सुरू झाल्याने सर्वच ग्राहक वर्गाकडून मेथीच्या जुडीला मागणी असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झाली आहे.
सोमवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील साईबन व्हेजिटेबल कंपनीत विक्रीसाठी आलेल्या मेथीला ७५०० रुपये शेकडा असा बाजारभाव मिळाल्याची माहिती संचालक नितीन लासुरे यांनी दिली आहे. येत्या २/३ दिवसांत मेथी जुडीची आवक आणखी घटल्यास मेथीचे दर तेजीत राहण्याची शक्यता असल्याचे लासुरे यांनी सांगितले (वार्ताहर)