‘सह्याद्री’च्या कुशीत बहरला निसर्गाचा पुष्पोत्सव

By अझहर शेख | Published: September 25, 2018 12:35 AM2018-09-25T00:35:25+5:302018-09-25T00:36:52+5:30

‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

 The Festival of Bihrrala Nature, in the hands of Sahyadri | ‘सह्याद्री’च्या कुशीत बहरला निसर्गाचा पुष्पोत्सव

‘सह्याद्री’च्या कुशीत बहरला निसर्गाचा पुष्पोत्सव

Next

नाशिक : ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे. निसर्गप्रेमींना भंडारदऱ्यातील हे अभयारण्य क्षेत्र पुन्हा एकदा खुणावू लागले आहे.  अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्टतील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व तेथील भूभागावर रानफुलांचे ताटवे बहरले आहेत. वृक्षसंपदेने नटलेले कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांच्या नेहमीच पसंतीला उतरले आहे. पावसाळ्यात याच परिसरात विविध धबधब्यांनी आलेल्या पर्यटकांना आकर्षित केले तर आता पुन्हा निसर्गाकडून सौंदर्याची वेगळीच उधळण येथे केली जात असल्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत. येथील मोकळ्या भूखंडांवर हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर रानफुले फुलली असून, निसर्गाचा हा पुष्पोत्सव निसर्ग छायाचित्रकारांसह पुष्पप्रेमी व फुलपाखरूप्रेमींना भुरळ घालत आहे.
कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याचे क्षेत्र शेंडी गावापासून सुरू होते. भंडारदरा व राजूर अशा दोन वनपरिक्षेत्रात विभागलेल्या या अभयारण्यात सुमारे १८ ते २० लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो. आदिवासी लोकवस्ती असलेल्या या सर्व गावांमध्ये नाशिक वन्यजीव विभागाने गाव परिस्थितीकीय विकास समिती गठित केली असून स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देत जंगल संवर्धनासाठीही प्रवृत्त केले आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत हा पुष्पोत्सव भंडारदरा परिसरात पहावयास मिळणार आहे.
अशा आहेत रानफुलांच्या प्रजाती
या अभयारण्य क्षेत्रात बहरलेल्या रानफुलांमध्ये टोपली भुई, खुरपापणी, कवळा, नीलकंठ, रानआले, रानहळद, जांभळी मंजिरी, सोनकी, कानपेट, मोठी सोनकी, लाल तेरडा, हिरवी निसुर्डी, जांभळी चिरायत, रान अबोली, पिवळी कोरांटी, ढाल तेरडा, कळलावी, धायटी, आभाळी-नभाळी, हळदी-कुंकू, अग्निशिखा, सोनसरील, घाणेरी, पांढरी कोरांटी अशी विविध रानफुले, मधमाशा व फुलपाखरांची अमाप जैवविविधता या अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळते.
भंडारदरा परिसरात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विविध रानफुलांचे ताटवे फुललेले दिसतात. निसर्गाची जैवविविधता अभ्यासण्याची उत्कृष्ट संधी या काळात मिळते. फुलपाखरू, मधमाशांच्या प्रजातीही दिसतात. पर्यटकांनाही या पुष्पोत्सवाचे आकर्षण असते.अकोले तालुक्यातील अखेरच्या टोकाला असलेल्या सर्वच गावांमध्ये फुलांचा बहर सध्या पहावयास मिळतो.  - रवि ठोंबाडे, गाइड, अकोले

Web Title:  The Festival of Bihrrala Nature, in the hands of Sahyadri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.