रंगप्रेमींचा ठिकठिकाणी जल्लोषात रंगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:01 AM2019-03-27T00:01:58+5:302019-03-27T00:10:48+5:30
पंचवटी परिसरात सोमवारी ठिकठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमीनिमित्ताने शेकडो आबालवृद्धांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर सप्तरंगांची उधळण केली.
पंचवटी : पंचवटी परिसरात सोमवारी ठिकठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमीनिमित्ताने शेकडो आबालवृद्धांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर सप्तरंगांची उधळण केली. विशेष म्हणजे शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत उड्या घेण्यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती.
रंगपंचमीचे औचित्य साधून सोमवारी परिसरातील चौकाचौकांत असलेल्या सार्वजनिक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच सोसायट्या, कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी उंच इमारतीच्या छतावर डीजे लावून मराठी, हिंदी गीतांवर ठेका धरीत मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला. चौकाचौकांत रंगपंचमी साजरी करण्यात आल्याने परिसरातील रस्ते गुलाबी, निळा, लाल, पिवळा, हिरवा, तांबड्या रंगांनी न्हाऊन निघाले होते. लहान मुलांनी एकमेकांच्या अंगावर पिचकारीने रंग उडविले तर कोणी रंगाने भरलेले फुगे अंगावर फोडून रंगपंचमी साजरी केली. युवक-युवतींनी एकमेकांच्या चेहºयाला रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला.
शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलाबी रंग तयार करण्यात आला होता. रहाडीत उड्या मारण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली असल्याचे चित्र दुपारनंतर दिसून आले. दुपारी रहाडीचे मानकरी असलेल्या दीक्षित कुटुंबातील सदस्याने विधिवत पूजन करून रहाडीत अंघोळ केल्यानंतर रहाड रंगप्रेमींसाठी खुली करण्यात आली. या रहाडात उड्या घेण्यासाठी शेकडो युवकांनी मोठी गर्दी केली होती. रंगपंचमी निमित्ताने बालगोपाळांनी डोक्यावर आकर्षक टोप्या तसेच चेहºयावर आकर्षक मुखवटे परिधान केले होते. परिसरातील काही मित्रमंडळाच्या वतीने पाण्याचे शॉवर लावण्यात आले होते. रंग असलेल्या शॉवरखाली तरुण, तरुणींनी भिजण्याचा आनंद लुटला.
पंचवटीत दुपारनंतर रंगपंचमीला उत्साहात सुरुवात झाली. रंगपंचमीनिमित्त अनेकांनी एकमेकांना रंग लावून तर काहींनी व्हॉट्सअॅप, फेसबुक, सोशल मीडियावर रंगपंचमीचे संदेश अपलोड करत रंगीबेरंगी शुभेच्छा दिल्या.
परिसरातील शनिचौक, पंचवटी तसेच पंचवटी गावठाण, मेरी, आरटीओ परिसर, दिंडोरीरोड, म्हसरूळ, हिरावाडी, कमलनगर, पेठरोड, नांदूर, आडगाव, राममंदिर परिसर, मखमलाबाद, फुलेनगर, विडी कामगारनगर, आदींसह परिसरात उत्साहात रंगोत्सव साजरा करण्यात आला.
भगूरला उत्साह
शहर व परिसरात लहान मुले, महिला आणि तरुणांनी मोठ्या उत्साहात रंग व पाण्याची उधळण करत रंगपंचमी उत्साहात साजरी केली. सकाळपासूनच लहान मुलांनी एकमेकांच्या घरात जाऊन रंग लावत आनंद लुटला तर दुपारनंतर विशेषत: तरुण युवकांनी आपल्या प्रभागात पाणी टँकर उभा करून काहीनी रंगांची पिंपे भरून गाण्याच्या तालावर रंगांची उधळण करत जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. महिलांनीही कोरड्या रंगांऐवजी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
आबालवृद्धांमध्येही अमाप उत्साह
रंगांच्या या उत्सवात तरुणाईबरोबर आबालवृद्धही रंगांमध्ये न्हाऊन निघाले़ शहरातील कॉलनी, सोसायटी परिसरांमध्ये कुटुंबीयांची रंगपंचमी रंगात आल्याचे दिसून आले़ चिमुकल्यांनी आपल्या आजी-आजोबांनाही रंग लावला तर, बालगोपाळांच्या आनंदात आजी-आजोबाही सहभागी होताना दिसले़