उबड्याहणवंत गावकऱ्यांनी अनुभवला प्रकाशाचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:03 PM2020-01-03T18:03:26+5:302020-01-03T18:04:48+5:30
गावाला मिळाली वीज : सिंगल फेज ट्रान्सफार्मरचे उद्घाटन
सटाणा : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांतही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या तालुक्यातील पश्चिम पट्टयातील अतिशय दुर्गम भागातील उबड्याहनवंत या गावाने प्रकाशाचा उत्सव अनुभवला. गावात सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते झाले आणि गावातील उंबर उंबरा वीजेच्या प्रकाशझोतात आला.
उबड्याहनवंत या गावात सिंगल फेज इलेक्ट्रिक ट्रान्स्फार्मरचे उदघाटन झाले त्याप्रसंगी, अशा वंचितांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून आगामी काळात मूळप्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिलीप बोरसे यांनी यावेळी दिले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच राणीबाई भोये या होत्या. बागलाण तालुक्याच्या पश्चिमेला कळवण हद्दीलगत असलेल्या या गावात पिण्याचे पाणी, दवाखाना, शाळा, अंगणवाडी अशा कोणत्याही मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत. त्यामुळे हा परिसर विकासापासून वंचित राहिलेला आहे. याठिकाणी कळवण तालुक्यातील सिरसा या गावातुन सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात आली . यावेळी माजी आमदार जीवा गावित यांनीही मनोगत व्यक्त केले. शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आदिवासींना अधिकार आहेत मात्र बोगस आदिवासी मुळे कोणत्याही शासकीय योजना या परिसरात मिळू शकलेल्या नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पोपट गवळी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्र मास लक्ष्मण गावित, सोमनाथ सूर्यवंशी, भास्कर बच्छाव, पंडित अहिरे, सावळीराम पवार, भीमराव चौधरी, उत्तमराव कडू, पांडुरंग वाघमारे, विजय भामरे, काळू बागुल , साल्हेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप पवार, सुभाष भोये , दगा भोये , तुकाराम ठाकरे, दादा जाधव, अंबादास जोपळे, काळू महाजन, आदींसह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.