मद्यपार्टी शोधण्यासाठी ‘मुक्त’चे वरातीमागून घोडे विद्यापीठातच फेस्टिव्हल: पोलिसांकडून चौकशी
By Admin | Published: February 8, 2015 12:47 AM2015-02-08T00:47:18+5:302015-02-08T00:47:52+5:30
मद्यपार्टी शोधण्यासाठी ‘मुक्त’चे वरातीमागून घोडे विद्यापीठातच फेस्टिव्हल: पोलिसांकडून चौकशी
नाशिक- एका वाइन फेस्टिव्हलसाठी नाशिकमध्ये आलेल्या आणि मुक्त विद्यापीठाच्या यश इन या इमारतीमध्ये उतरलेल्या पर्यटकांनी शुक्रवारी येथेच रसपान केल्याचे उघड झाले. त्यानंतर ते ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर भल्या सकाळी विद्यापीठाने खोल्यांमध्ये कसून तपासणी केली, परंतु काहीच आढळले नाही आणि पार्टीही झाले नाही अशी सारवासारव विद्यापीठाने केली आहे. तथापि, शुक्रवारी पार्टी करणारे पर्यटक शनिवारी विद्यापीठाचे अधिकारी येण्याची वाट बघणार आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने बांधलेले यश इन इमारतीत शुक्रवारी पाहुण्यांनी कक्षातच मद्यपान केल्याचे वृत्त आहे. एका वाइन फेस्टिव्हलसाठी नाशिकमध्ये आलेल्या अभ्यागंतासाठी मुक्त विद्यापीठाने ७० ते ८० खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातच पाहुण्यांनी मद्यपान केले असून, खोल्यांमध्ये असलेल्या बाटल्यांवरून ते स्पष्ट होत आहे. यासंदर्भात शनिवारी लोकमतमध्ये ‘ज्ञानगंगेच्या दारी मद्यपींची वारी’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव प्रकाश अतकरे यांनी यश इनची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यासमवेत विद्यापीठात जाऊन तपासणी केली. विशेष म्हणजे ज्या वाइनरीमध्ये फेस्टिव्हल होत आहे, त्या कंपनीचे प्रतिनिधी आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सर्व खोल्यांची तपासणी केली, परंतु प्रत्यक्षात काहीच आढळले नाही असा दावा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी केला आहे. त्याठिकाणी पार्टी झाल्याचे काहीही आढळले नाही असे त्यांनी सांगितले. अर्थात, विद्यापीठाने असा दावा केला असला तरी पार्टी करणारे नंतर कोणता पुरावा विद्यापीठासाठी सोडणार असा प्रश्नच आहे. विशेषत: खोल्यांमध्ये झालेल्या पार्टीवर विद्यापीठ कोणत्या पद्धतीने लक्ष ठेवू शकते, असे असताना विद्यापीठाने मात्र काहीच घडले नाही असा दावा केला आहे.