एक तपापासून ‘तो’ करतोय भटक्या श्वान अन् मांजरींचे संगोपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:25+5:302021-03-01T04:17:25+5:30
जागतिक मांजर दिन --- नाशिक : कुत्रे अन् मांजर एकमेकांचे कट्टर वैरी असल्याचे जगजाहीर आहे. या दोन्ही वेगळ्या कुळाचे ...
जागतिक मांजर दिन
---
नाशिक : कुत्रे अन् मांजर एकमेकांचे कट्टर वैरी असल्याचे जगजाहीर आहे. या दोन्ही वेगळ्या कुळाचे प्राणी एकत्र गुण्यागोविंदाने राहत सोबत जेवण करत असतील, अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही. मात्र, रामवाडीतील तळेनगर भागातील एका घरात हा अपवाद बघावयास मिळतो. एकाच छताखाली श्वान व मांजरींचा गलका नजरेस पडतो. एक तपापासून भटक्या श्वान अन् मांजरींच्या संगोपनाचे व्रत निष्ठेने जोपासणाऱ्या राजू कुमावत यांच्या घरी बागडणाऱ्या मांजरी व श्वानांची पक्की दोस्ती बघणारा अवाक् होतो.
मांजरप्रेम हे बहुतांश कुटुंबीयांमध्ये पाहावयास मिळते. शहरात असे बहुसंख्य मांजरप्रेमी असून त्यांच्याकडून पर्शियन प्रजातीच्या मांजरींचा जिवापाड सांभाळ केला जातो. तसेच देशी मांजरीदेखील अनेकांच्या घरातील अघोषित सदस्य बनल्याचे सभोवताली दिसून येते. तळेनगरमध्ये राहणारे राजू हे जुन्या लाकडी वस्तूंच्या खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना मुक्या प्राण्यांविषयी कमालीची आस्था आहे. परिसरात कोठेही जखमी मांजर किंवा श्वान असल्याची माहिती मिळताच ते धावून जातात. त्यांना ‘रेस्क्यू’ करत घरी आणून औषधोपचार करून हा अवलिया कायमस्वरूपी या मुक्या जिवांचे पालकत्व स्वीकारताना दिसून येतो. त्यांनी गेल्या बारा वर्षांमध्ये अशा बहुसंख्य मांजरी व श्वानांना जीवदान दिले आहे. कर्करोग, पक्षाघातासारख्या दुर्धर आजारांमधून काही मांजरींसह श्वानांची सुटका केल्याचे ते सांगतात.
---इन्फो---
कुटुंबीयांचाही मांजरी अन् श्वानांना तितकाच लळा
कुमावत यांना जितका मांजरी व श्वानांचा लळा आहे, तितकाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक लळा त्यांच्यासोबत वावरणाऱ्या मांजरी व श्वानांनाही कुमावत कुटुंबाचा लागलेला दिसून येतो. अत्यंत मैत्रीपूर्ण नाते या घरातील माणसे व प्राण्यांमध्ये दिसून येते. श्वान मांजरीवर भुंकत नाही की, मांजरी श्वानांवर गुरगुरत नाहीत, असे अनोखे दृश्य प्रत्येकालाच आश्चर्यचकित करणारे आहे.
---इन्फो--
महापुराने शंभर मांजरींना हिरावून नेले
२०१९ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीसह नाल्यांना आलेल्या महापुरात कुमावत यांचे घर पाण्याखाली गेले होते. घरातील संसारोपयोगी वस्तूंसह सुमारे शंभरपेक्षा अधिक मांजरी वाहून गेल्या. काही मांजरींना वाचविण्यास त्यांना यश आले. मात्र, पुराच्या पाण्याच्या प्रकोपापुढे त्यांचे प्रयत्न कमी पडले आणि शंभराहून अधिक मांजरींना या नैसर्गिक आपत्तीने कायमचे या प्राणीप्रेमीपासून हिरावून नेले. त्या आठवणीने आजही कुमावत यांच्या अंगाला शहारे येतात.
--
कोट
एका अपघातातून जीवदान मिळाले. दोन्ही पायांनी अधू झालो होतो. तेव्हापासून श्वान व मांजरींचा लळा लागला. गेली बारा वर्षे झाली मी या मुक्या प्राण्यांची सेवा करत आहे. त्यांच्या सेवेमुळेच मी आज सुखी जीवन जगत आहे. महापुरात माझ्या शंभर मांजरी वाहून गेल्या. आयुष्यात माझी सर्वांत मोठी संपत्ती या रूपाने मी गमावली. मुक्या प्राण्यांवर माणसाने दया करावी. जगा आणि जगू द्या, इतकेच मी सांगू इच्छितो.
-राजू कुमावत, प्राणीप्रेमी
----
फोटो क्र : २८पीएचएफबी९७ /