नाशिकरोडला मोजकीच सार्वजनिक मंडळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:32 AM2018-09-20T00:32:04+5:302018-09-20T00:32:30+5:30
गणेशोत्सवाकरिता मनपा, पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे.
नाशिकरोड : गणेशोत्सवाकरिता मनपा, पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. हातावर मोजण्याइतकीच मोठी गणेश मंडळे राहिल्याने भाविकांनादेखील देखावे, आरास बघण्यास उत्साह नाही. काही वर्षांपूर्वी नाशिकरोड परिसरातील गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख होती. गणेशोत्सव साजरा करताना मंडळांमध्ये स्पर्धा लागत असल्याने मोठमोठे आरास, देखावे उभारले जात होते. गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूकदेखील मध्यरात्री उशिरापर्यंत राहात होती. तर गणेशोत्सवात सायंकाळपासून भाविक देखावे-आरास बघण्यासाठी येत असल्याने रस्ते भाविकांनी फुलून जात होते. नाशिकरोडच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाविकदेखील सहकुटुंब दर्शनासाठी येत असल्याने दहा दिवसांत भारावलेले मंगलमय वातावरण राहात होते.
मात्र गेल्या काही वर्षांत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या झपाट्याने रोडावली गेली. काही मंडळे जागेअभावी बंद झाली तर काही मंडळांचे कार्यकर्ते कामधंदा, संसाराला लागल्याने हळूहळू त्या मंडळांची आरास कमी प्रमाणात होत ती मंडळे बंद झाली. गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाच्या जाचक अटी व यंदाच्या वर्षी मनपाने अटीचा कहरच केल्याने काही मंडळांनी विविध कारणास्तव गणेशोत्सव साजरा करणे बंद केले. त्यामुळे यंदाच्या वर्षी हातावर मोजण्याइतकीच मोठी मंडळे राहिली आहेत. तर दुसरीकडे सोसायटी-कॉलनीतील मंडळांची संख्या वाढली आहे. वर्गणी मागायला कार्यकर्ते जाण्यास तयार नाही, वेळ नाही, रहिवासी-व्यापाऱ्यांकडून वर्गणीचा सढळ हात आखुड झाला, भाडेतत्त्वावर मिळणारे देखावे महाग झाले, शहरात देखावे साकारणारे कारागीर, मूर्तिकारांची संख्या रोडावली, रहिवासी, भाविकांचा स्पोर्ट उत्साह कमी झाला अशा विविध कारणांमुळे नाशिकरोडच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला घरघर लागली आहे.
जुन्या नाशकातील सामाजिक-राजकीय नेत्यांप्रमाणे मंडळ चालविण्यास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते धजावत नसल्याने नाशिकरोडचा सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या अर्ध्या तासात बघून होतो. नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, ईगल स्पोर्ट्स अॅन्ड सोशल क्लब, बालाजी सोशल फाउंडेशन, अनुराधा फ्रेंड सर्कल, मातोश्री मित्रमंडळ, स्वराज्य मित्रमंडळ, जयभद्रा मित्रमंडळ, श्री गणेश एकता कला-क्रीडा मंडळ, जेलरोडचा राजा मित्रमंडळ आदी काही मंडळे गणेशोत्सवाची परंपरा कशीतरी टिकवून धरत आहे. देखावे-आरास बघण्यास नसल्याने भाविकांमध्ये अनुत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने देखावे पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी वाढत आहे.
स्वागत फलक लावल्याने उलटसुलट चर्चेला उधाण
मनपा व पोलीस प्रशासनाच्या जाचक अटीमुळे गणेशोत्सव मंडळांची संख्या रोडावली आहे. सार्वजनिक मंडळांनी जाचक अटींचे अडथळे पार करत परंपरा टिकविण्यासाठी अत्यंत अवघड परिस्थितीत गणेशोत्सव साजरा करत आहे. राजकीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांना म्हणावी तशी परवानगीबाबत मदत झाली नाही, मात्र एका पक्षाच्या पदाधिकाºयाने चमकोगिरी करत ठिकठिकाणी कमानी, मंडपाजवळ भाविकांचे स्वागत करणारे फलक लावल्याने भाविकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.