वाहन शोरुमच्या वर्कशॉपला भीषण आग; सात बंबाच्या सहाय्याने जवानांनी मिळविले नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 09:23 PM2020-10-22T21:23:34+5:302020-10-22T21:25:15+5:30
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सात बंबाच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा फायरमन जवान शर्थीचे प्रयत्न करत आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणत होते.
नाशिक : येथील पाथर्डीफाटा येथील एका चारचाकी वाहनाच्या शोरुमला गुरुवारी (दि.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची सुरुवात वाहन शोरुमच्या वर्कशॉपपाासून झाली. रात्री पाऊस सुरु असतानाही क्षणार्धात आगीने रौद्रावतार घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सात बंबाच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा फायरमन जवान शर्थीचे प्रयत्न करत आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणत होते.
पाथर्डीफाटा येथील 'जितेंद्र सर्व्हिसेस' नावाच्या शोरुमच्या पाठीमागे असलेल्या वर्कशॉपमधील बॅटऱ्यांमध्ये अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटनेची माहिती शोरुममधील सुरक्षारक्षकांकडून तातडीने अग्निशमन दलाला कळविवण्यात आली. तातडीने सर्वप्रथम लेखानगर येथील सिडको उपकेंद्राचे दोन बंब एकापाठोपाठ घटनास्थळी पोहचले. या बंबांवरील जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली; मात्र आगीने रौद्रावतार धारण केल्यामुळे अतिरिक्त मदतीचा 'कॉल' अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला घटनास्थळावरुन दिला गेला. त्यामुळे तत्काळ शिंगाडा तलाव मुख्यालयातील २, सतपूर, नाशिकरोड, विभागीय केंद्र कोणार्कनगर यांचे प्रत्येकी एक असे एकूण ७ बंब घटनास्थळी पोहचले. यामध्ये एक मेगाबाऊजर व दोन बाऊजर बंबाचाही समावेश होता. अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविणे जवानांना शक्य झाले. सुदैवाने शोरुम बंद झाल्यानंतर आगीचा भडका उडाल्यामुळे जिवीतहानीचा धोका टळला. कारण यावेळी वर्कशॉप परिसरात कोणतेही कामगार कार्यरत नव्हते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत वाहन शोरुमच्या मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात होता.