तडीपार गुंडांचा नाशिक शहरामध्ये वाढता शिरकाव; पोलिसांपुढे नवे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:22 PM2017-11-02T16:22:35+5:302017-11-02T16:31:11+5:30
नाशिक : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचा शहरात पुन्हा शिरकाव होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. कधी औषधोपचाराच्या बहाण्याने तर कधी नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगत तडीपार गुंड शहरात आल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपुर्वी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार गुंडाला अटक करण्यात आली. यानंतर पुन्हे गुुन्हे शाखेच्या युनिट-२ने तडीपार संतोष मानेला शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमधून अटक केली.
शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलणारा संशयित आरोपी संतोष बबन माने (रा.दत्तनगर) यास शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे; मात्र काही दिवसांपासून माने हा शहरातच वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मानेच्या मागावर पोलीस होते;मात्र तो त्यांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी होत होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने मानेचा माग काढत गुप्त बातमीदाराकडे चौकशी करून माने हा अंबड औद्योगिक वसाहतीच्या परिसरात वावरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळविली. त्यानुसार पथकाने या भागात पाळत ठेवून सापळा रचला. एक्स्लो पॉइंट चौफूली येथे माने आला असता पोलिसांनी त्यास अटक केली.
दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधीर जुने नाशिक परिसरातील कथडा भागात राहणारा समीर उर्फ पप्पी शेख (३०) यालाही पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याने तडीपार आदेशाचा भंग करीत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होऊन औषधोपचार घेत असल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलिसांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फूटेज तपासून खात्री केली असता पप्पीने उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला अटक दोन दिवसांपुर्वीच अटक केली. एकूणच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातून गुंडांना एक व दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केलेले असतानाही ते विविध कारणास्तव शहरामध्येच वावरत असल्याने कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. शहरात वाढती सोनसाखळी, घरफोडी, दुचाकीचोरीच्या घटनांसह तडीपारांचा वावरामुळे ‘गॅँगवार’सारख्या गुन्हयांचाही धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांपुढे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तडीपार सराईत गुन्हेगार तपासून ते शहराबाहेर असल्याबाबत खात्री करण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे.